संस्थाप्रमुख रत्नाकर मखरे यांचे प्रतिपादन
(भिमाई आश्रमशाळेत संत गाडगे बाबांच्या ६४ व्या स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवली..)
इंदापूर:- (दि.२० डिसेंबर २०२०) प्रतिनिधी :- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, ज्युनिअर कॉलेज,मुलांचे व मुलींचे अनुदानित
वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या ६४ व्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी भिमाई प्राथमिक आश्रमशाळा इंदापूरचे मुख्याध्यापक श्री साहेबराव पवार सर यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमा प्रसंगी रत्नाकर मखरे म्हणाले की, संत गाडगेबाबा एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात गाडगेबाबांची जास्त रुची होती. सामाजिक न्याय देण्यासाठी ते गावोगावी फिरत असतं. जनजागृतीसाठी गाडगेबाबांनी समाजातील दारिद्र्य आणि जातिभेदांमुळे निर्माण होणारी विषमता तसेच देवभोळेपणा यांच्यावर त्यांनी आपल्या कीर्तनातून कडाडून वार केले.
मखरे पुढे म्हणाले की, गाडगे बाबा प्रबोधन करताना म्हणायचे की,"देव दगडात नसून तो माणसांत आहे." यासाठी माणूस घडवणे हेच आपलं ब्रीद वाक्य असायला हवं.त्यासाठी शिक्षण घ्यायला हवं ' असं गाडगेबाबांचा मत होतं.
गाडगेबाबांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा ,भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी व प्रथा दूर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. स्वच्छतेचे महत्व लोकांना पटवून देतं. गाडगे बाबांनी अनेक धर्मशाळा बांधल्या. अनेक जनकल्याणाची कामे राबवली आणि यशस्वीरित्या पार पाडली. जाती-धर्म आणि वर्ण हा भेद त्यांच्याजवळ नव्हता. गाडगे बाबा समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या मनात लोककल्याणाची भावना होती. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली.
मखरे शेवटी म्हणाले की, दिनांक १४ जुलै १९४१ मध्ये संत गाडगे बाबांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्या प्रकृतीची वार्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समजताच बाबासाहेबांनी स्वतःचे महत्वाचे काम सोडून दिले.लगेचच दोन घोंगड्या विकत घेतल्या आणि थेट संत गाडगेबाबांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले. संत गाडगेबाबा कधीच कोणाकडून काहीच घेत नव्हते. परंतु बाबासाहेबांनी आणलेल्या दोन घोंगड्या गाडगे बाबांनी घेतल्या.
गाडगे बाबा म्हणाले,
डॉक्टर तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचा मोठा अधिकार आहे."
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
'बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा, उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही, 'तुमचा अधिकार मोठा आहे.' याप्रसंगी डॉ. आंबेडकर यांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण हा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.
संत गाडगे बाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीचा हृदय स्पर्शी दाखला देऊन मखरे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिमाई प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री. साहेबराव पवार सर यांनी केले तर सूत्रसंचालन नानासाहेब सानप सर यांनी केले.
कार्यक्रमास संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन सदर करण्यात आले.

