भारत २६ डिसेंबर २०२० रोजी मेलबोर्नच्या ड्रॉप इन पीचवर सलग दुसरी कसोटी ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळणार आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियाविरूध्दचा शंभरावा कसोटी ठरणार असून या शतक महोत्सवी सामन्यात भारताचे नेतृत्व अजिंक्य राहाणे करणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील भारत व ऑस्ट्रेलिया या उभय देशांमधील हा दुसरा कसोटी सामना आहे. आपणास माहीती आहेच की, यापूर्वी झालेला पहिला कसोटी सामना ॲडलेड येथे दिवस रात्र पद्धतीने खेळविला होता.
या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. परंतु तो असा पराभव होता की त्याने समस्त क्रिकेेट जगतात भूकंप घडविला होता. त्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळलेल्या भारतीय संघाचा दुसरा डाव फक्त ३६ धावात कोलमडल्याने नजरेच्या टप्पात आलेला विजय भुर्रकन उडून ऑस्ट्रेलियाच्या पाल्यात गेला. या पराभवाने दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघात खूप मोठे बदल करावे लागले.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एक किस्सा घडला की, संघ परदेशात पराभवाच्या खाईत सापडलेला असताना संघाचा कर्णधार व प्रमुख फलंदाज विराट कोहली पत्नीच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतला. कोहलीच्या मायदेशी परतण्याने आधीच कमकुवत असलेली फलंदाजी फारच दुबळी बनली. त्यातच प्रभावी गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही पहिल्या कसोटीत जखमी झाल्याने धारदार भासणाऱ्या गोलंदाजीत अपंगत्व आलं. या दोन खेळाडूंच्या जागेवर अनुक्रमे रविंद्र जडेजा व पदार्पणवीर मोहम्मद सिराजची निवड करण्यात आली तर पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेल्या सलामीवीर पृथ्वी शॉ च्या ऐवजी शुभमन गिलला स्वतःच्या कसोटीचा श्रीगणेशा करता येणार आहे. याचबरोबर यष्टीरक्षक वृध्दीमान साहाची जागा रिषभ पंत घेईल. या चार बदलाने संघात स्थिरता येऊन संतुलन साधल्याचे वाटत असून प्रत्यक्ष सामन्यात संघ कसे प्रदर्शन करतो यावरच सर्व काही अवलंबून आहे. मागच्या सामन्यातील पराभवाने भले संघाचे मनोधैर्य खालावले असले तर काही बिनीच्या खेळाडूंना संधी दिल्याने भारत ऑस्ट्रेलियावर पलटवार करण्याची मोठी शक्यता आहे. कारण भारताचे नेतृत्व अपयशी कोहली ऐवजी शंभर टक्के यशाची सरासरी असलेला हंगामी कर्णधार अजिंक्य राहणे करणार आहे. काही स्वयंघोषित क्रिकेट पंडित व ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू भले ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शक्यता वर्तवित असले तरी भारत बाजी मारेल असाच अंदाज काहीसा दिसत आहे.
सन १९३२ मध्ये आपल्या कसोटी क्रिकेटला सुरूवात करणाऱ्या भारताने आजवर ५४३ कसोटी खेळले असून त्यातील १५७ सामने जिंकले आहेत, तर १६८ सामन्यात पराभव पत्करला आहे. भारताचे २१७ सामने अनिर्णित राहीले असून एक सामना टाय झाला आहे. भारताचा ऑस्ट्रेलियाविरूध्द हा शंभरावा सामना असणार आहे. तर या आधीच्या ९९ पैकी २८ सामने भारताने तर ४३ ऑस्ट्रेलियाने जिंंकले आहेत. २७ सामने अनिर्णित राहीले. तसेच सन १९८६ मधील तत्कालीन मद्रास येथील सामना टाय झाला होता.
या सामन्यापूर्वी भारताने इंग्लंडविरूध्द १२२, ऑस्ट्रेलियाविरूध्द ९९, वेस्ट इंडिज ९८, न्यूझिलंड व पाकिस्तान विरूध्द प्रत्येकी ५९-५९, श्रीलंकेविरूध्द ४४, दक्षिण आफ्रिकेविरूध्द ३९, बांगलादेश व झिंबाब्वेविरूध्द प्रत्येकी ११-११, तर आफगाणिस्तानविरूध्द एक कसोटी सामना खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाविरूध्द कमीत कमी १०० कसोटी खेळणारा भारत मेलबोर्न सामन्यानंतर तिसरा संघ ठरणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया इंग्लंडविरुद्ध ३५१ व विंडीजविरूध्द ११६ कसोटी सामने खेळले आहे.
भारत ऑस्ट्रेलियाविरूध्द आपला शतक महोत्सवी सामना खेळणार असून त्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधून आपले आव्हान जिवंत ठेवेल अशी अपेक्षा ठेवून भारतीय संघाला व समस्त क्रिकेटप्रेमींना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

