बॉक्सिंग या शब्दाचा शब्दशः अर्थ बघितला तर मुष्टीयुष्ट असा समजला जातो. परंतु बारकाईने विचार केला तर बॉक्सिंग व क्रिकेटचा दूर दूरूनही संबंध येत नाही. मग आणखी एक प्रश्न होतो की, बॉक्सिंग डे म्हणजे नेमके काय ? वास्तविक बघितलं तर एक बाब लक्षात येते की, २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस ( नाताळ ) असतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी लोक आपले मित्र, नातेवाईक, स्नेही, तथा कंपन्या - कारखाने आपल्या कर्मचाऱ्यांना भेट वस्तू घातलेले रंगी बेरंगी बॉक्स भेट म्हणून देतात. त्यामुळे २६ डिसेंबरला बॉक्सिंग डे असे समजतात व त्या दिवशी खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे टेस्ट म्हणतात.
सुरूवातीच्या काळात बॉक्सिंग डे कसोटी फक्त ऑस्ट्रेलियातच खेळल्या जायच्या. परंतु त्या आता न्यूझिलंड व द. आफ्रिकेतही खेळल्या जातात. याच बॉक्सिंग डे कसोटीच्या ऐतिहासीक घडामोडींची माहीती आपण प्रस्तुत लेखात वाचू या.
नाताळाच्या दुसऱ्या दिवशी बॉक्सिंग डे टेस्ट खेळण्याची प्रथा सन १९५० मध्ये सुरू करण्यात आली तसेच ती एखाद दुसरा अपवाद वगळता आजतागायत सुरूच आहे. २६ ते ३० डिसेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया विरूध्द बॉक्सिंग डे कसोटी खेळला जातो व तोही मेलबोर्न येथे खेळणेच जरूरीचे आहे. सन १९५० मध्ये झालेला क्रिकेट इतिहासातील पहिला बॉक्सिंग डे टेस्ट ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यात खेळला गेला आणि तोही कांगारूंनी २५ धावांनी जिंकला.
सन १९५३ ते १९६७ दरम्यान खेळले गेलेले बॉक्सिंग डे कसोटी सामने मेलबोर्न येथे खेळले गेले नव्हते. सन १९६८, १९७४ साली झालेले सामनेही मेलबोर्नला झाले नव्हते. सन १९६७, ७२ व ७६ मध्ये ते अॅडलेडला खेळविण्यात आले. त्यानंतरचे बॉक्सिंग डे टेस्ट मेलबोर्नलच झाले. सन १९८० नंतर बॉक्सिंग डे टेस्टचे सर्व अधिकार मेलबोर्नने अधिकृतपणे आपल्याकडे घेतले. सन १९८९ मध्ये बॉक्सिंग डे च्या दिवशी कसोटी सामना न होता श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान एक दिवशीय सामना खेळविण्यात आला होता.
सन १९८० नंतर ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न क्रिकेट ग्राउंडवर दरवर्षी बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला जातो. यंदा तो मान भारताला मिळाला असून या दिवशी न्यूझिलंडमध्ये न्यूझिलंड व पाकिस्तान तसेच द. आफिकेत द. आफ्रिका व श्रीलंका यांच्या दरम्यान बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळविला जाणार आहे. मागच्या वर्षी भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत १३७ धावांनी ऑस्ट्रेलियाला हरविले होते.
भारत व बॉक्सिंग डे कसोटीचा संबंध तपासला तर भारत ऑस्ट्रेलियात सन १९८५, १९९१, १९९९, २००३, २००७, २०११, २०१४ व २०१८ अशा
आठ बॉक्सिंग डे कसोटया खेळला असून त्यापैकी पाच सामन्यात भारताचा पराभव झाला आहे, दोन सामने अनिर्णित राहीले. तर सन २०१८ मध्ये भारताने १३७ धावांचा मोठा विजय ऑस्ट्रेलियावर मिळविला आहे.
ऑस्ट्रेलिया मायदेशात आतापर्यंत ३९ बॉक्सिंग डे कसोटया खेळला असून त्यापैकी २५ जिंकले तर अनुक्रमे सात सामने हरले तर सात अनिर्णित राहीले.
सन २०२० च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात भारत पहिली कसोटी अतिशय लाजिरवाण्या रितीने हरला असून येत्या २६ डिसेंबर पासून होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत अर्थात बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारत कशा रितीने ऑस्ट्रेलियन संघाचा सामना करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

