पिंपरी चिंचवड:-मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय स्टेडियम उभारण्यात येणार आहे. या स्टेडियमच्या कामाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हे स्टेडियम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या लौकिकात आणखी भर पडणार आहे.
मोशी येथे 10 एकर जागेवर हे बहुउद्देशीय स्टेडियम उभारण्यात येणार आहे. या स्टेडियमची आसनक्षमता 25 हजार एवढी आहे. या कामासाठी सुमारे 300 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
महापालिका सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापूर माई ढोरे होत्या. मोशी येथील बहुउद्देशीय स्टेडियम उभारण्याच्या प्रस्तावित कमला प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी उपसूचना माजी महापौर नितीन काळजे यांनी दिली. त्या उपसूचनेला माजी महापौर राहुल जाधव यांनी अनुमोदन दिले. त्याला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्याचा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या ‘व्हिजन 2020’ मध्ये केला होता. स्टेडियमच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियममुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे.
स्टेडियमसाठी प्रकल्प सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यानंतर आराखडा मंजूर करून निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. पुढील दोन ते अडीच वर्षात स्टेडियमचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

