इंदापूर प्रतिनिधी ( तात्याराम पवार)
बावडा: १४ डिसेंबर २०. समाज भूषण डॉक्टर लक्ष्मण आसबे यांनी मानवाचा खरा त्रास कोणता आहे .आणि तो कसा संपवता येतो. याचे सविस्तर विचार या वैचारिक लेखातून प्रकट केले.
ते आपल्या लेखणीतून लिहितात की,आपण आपले समजतो. तीच माणसे ज्या वेळेला आपल्याला त्रास देऊ लागतात , त्यावेळी होणाऱ्या वेदना असह्य असतात . त्यातही ती माणसे आपल्या रक्ताच्या नात्यातील असतील , तर मात्र आपल्या वेदनेला अंत रहात नाही . असा अनुभव आपल्याला यावा असे कोणालाच वाटत नाही , तरीही जीवनात असे अनुभव आल्याशिवाय रहात नाहीत . अशा प्रसंगात आपल्या जीवनामध्ये कमालीचे मानसिक ताण तणाव आणि नैराश्य उत्पन्न होते . नेमका धीर आणि आधार कोठे शोधावा ? हा प्रश्न पडतो .
काहीवेळेस या वेदना कोणाकडे व्यक्तही करता येत नाहीत कारण सगळीच माणसे आपण आपली समजत असतो . आपल्याला त्रास देणारी माणसे कधीतरी बदलतील , अशी वेडी आशा आपल्या मनात असते . आपला जीव चालला तरी , स्वार्थाने विकृत झालेली ही माणसे कधीच आपली होत नाहीत आणि आपल्याला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीत . आपल्या जीवनात येणाऱ्या मानसिक त्रासापैकी हा सर्वोच्च त्रास असतो .
जोपर्यंत आपल्या अंतकरणात ममत्व आहे , तोपर्यंत या त्रासापासून कोणत्याच उपायाने हा त्रास संपत नाही . जोपर्यंत आपण ममता सोडून देऊन विरक्त होत नाही , तोपर्यंत आपण समतेत येत नाही . मानवी जीवनात समता ही फक्त आत्मिक पातळीवर असते , देही अवस्था सोडून आत्मिक अवस्थेत आल्याशिवाय जीवनातील कोणत्याच दुःखाचे समूळ उच्चाटन होत नाही . आत्मा हा नित्य आहे , सत्चिदानंद आहे . त्याला दुःख आणि वेदना माहीत नाहीत व होतही नाहीत .
देह तव पाचाचे झाले I हे कर्माचे गुणी गुंतले II भवतसे चाकी सुदले I जन्म-मृत्यूच्या II
हे काळ नळाचे तोंडी I घातली लोणीयाची उंडी II माशी पाख पाखडी I तव हे सरे II
या देहाची ये दशा I आणि आत्मा तो येथ ऐसा II पै नित्य सिद्ध अपैसा I अनादिपणे II
आपल्याला त्रास देणाऱ्या माणसांना आपण त्रास देऊन किंवा त्याचा बदला घेऊन आपल्या जीवनातील हा मानसिक त्रास संपत नाही . याला संपवायचे असेल तर देहाचे ममत्व आणि तदाम्य संपवावे लागते , तरच आपली या त्रासातून कायमची सुटका होऊ शकते . दुसऱ्यात बदल घडवणे आपल्या हातात आणि आवाक्यात नसते , पण स्वतःला बदलणे आपल्या निश्चित हातात आहे आणि हाच याच्यावरचा जवळचा खात्रीशीर मार्ग आहे .
असो ऐसा कोठे आठवचि नाही I देहीच विदेही भोगू दशा II
सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार I आनंदे निर्भर डुल्लतसे II

