shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डोक्याला मार लागल्यानंतर वापरात येणाऱ्या कनकशन सबस्टीट्यूट नियमाचा इतिहास..!!

४ डिसेंबर २०२० रोजी ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील टि-२० मालिकेचा पहिला सामना सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळविला असला तरी हा सामना सर्वात जास्त स्मरणात राहील तो भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या डोक्याला झालेली दुखापत व त्यानंतर वापरण्यात आलेल्या कनकशन नियमामुळे.

सदर सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताच्या डावाच्या शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कचा चेंडू फलंदाजी करणाऱ्या डावखुऱ्या रविंद्र जडेजाच्या हेल्मेटवर आदळला.  भारताचा डाव संपल्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकिय चमूने जडेजाला वैद्यकीय तपासण्यांसाठी मैदानावर जाण्यापासून रोखले, व त्याच्याऐवजी फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलला मैदानात पाठविण्याचा निर्णय घेतला. तसेच तो निर्णय आयसीसीच्या नियमांप्रमाणे सामनाधिकारी ऑस्ट्रेलियाच्याच डेव्हीड बून यांनी उचलून धरला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ प्रशिक्षक जस्टीन लँगर व कर्णधार अरोन फिंच यांनी आक्षेप घेत बून यांच्याशी मोठी चर्चा केली. परंतु नियमाला बांधील असलेल्या बून यांनी आपल्या देशवासीयांच्या विरोधात निर्णय घेत आपले कर्तव्य बजावले. मात्र जडेजा ऐवजी संधी मिळालेल्या यजुवेंद्र चहलने करामती मारा करून कांगारूंच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले व महत्वाचे ३ फलंदाज केवळ २५ धावांत माघारी परतविले. चहल कनकशन नियमाने मैदानात उतरल्यानंतर सामनावीर ठरणारा टि -२० च्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासातला पहिला खेळाडू बनला.

सामनाधिकारी बून यांचा निर्णय ऑस्ट्रेलियन संघाला रुचला नाही. परंतु नियमांच्या आधीन राहात त्यांनी आयसीसीच्या नियमांचे पालन केले. वास्तविक या नियमांचा जास्तीत जास्त लाभ आतापर्यंत ऑस्ट्रेलियानेच सर्वाधिक वेळा घेतला असला तरी जडेजाऐवजी आलेल्या चहलने केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे कांगारूंची मोठा तिळपापड उडाला.

या सर्व घडामोडीत आयसीसीने मागच्या वर्षी विश्वचषक स्पर्धेनंतर आपल्या नियमावलीत बदल करत डोक्याला मार लागलेल्या खेळाडूंना पर्याय व त्याच्या संघाला दिलासा मिळावा असा निर्णय घेतला. याच कनकशन नियमाचा व त्याच्या ऐतिहासिक बाबींचा आढावा प्रस्तुत लेखात घेऊ या.

कनकशन सब्स्टीट्यूट या नियमाने राखीव खेळाडू मैदानात पाठविण्यापूर्वी जखमी झालेला खेळाडू फलंदाज, गोलंदाज ( फिरकी / वेगवान ) यष्टीरक्षक असेल तर त्याच प्रकारचा राखीव खेळाडू निवडला जातो. कनकशन सब्स्टीट्यूट या नियमाने राखीव खेळाडूला खेळण्यासाठी पाठविण्याचा निर्णय सर्वस्वी सामनाधिकाऱ्यावर अवलंबून असतो. एका सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी एकदाच या नियमाचा लाभ घेता येतो. डोक्यात चेंडू लागलेल्या खेळाडूची वैद्यकीय चाचणी निष्णात डॉक्टरांकडून झाल्यानंतर त्याचा अहवाल सामनाधिकाऱ्यांना देणे गरजेचे असते. तसेच जखमी झालेल्या खेळाडूला मैदानात पुन्हा परतायचे असेल तर डॉक्टरांची परवानगी आवश्यक असते. मात्र त्या दुखापत झालेल्या खेळाडूला त्याच दिवशी मैदानात परतण्यास परवानगी दिली जात नाही.

सन २०१४ साली ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन सलामीचा फलंदाज फिल हयूजेस शॉन अबॉटचा चेंडू उसळता चेंडू डोक्यात लागून दगावला होता. त्यानंतर हा नियम बनविण्यासाठी चर्चा झडू लागल्या.

कनकशन सबस्टीट्यूटच्या नियमांचा जन्मदाता ऑस्ट्रेलियाच असून ऑस्ट्रेलियाने सन २०१६ -१७ मध्ये देशांतर्गत पुरुष व महिलांच्या एकदिवसीय सामने, बिग बॅश, महिला बिग बॅशमध्ये प्रथम या नियमांचा उपयोग सुरू केला आहे. आयसीसीने सुरुवातीला या नियमांना मान्यता न दिल्याने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या इतर प्रथम श्रेणी स्पर्धा व शेफील्ड शील्ड स्पर्धेत या नियमांचा अवलंब करता आला नाही. सन २०१८ च्या सत्रात इंग्लंड क्रिकेट मंडळाने कौंटी स्पर्धात या नियमाचा उपयोग सुरू केला. सन २०१९ च्या एशेस मालिकेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम आयसीसीने लागू केला. ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्हन स्मिथला जोफ्रा आर्चरचा उसळता चेंडू डोक्यात लागल्यानंतर मॅग्नन्स लाबुशने या नियमाचा पहिला वापरकर्ता ठरला.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close