प्रतिनिधी । मोहन शेगर :
पुणे- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेची आवेदनपत्र (फॉर्म) ऑनलाईन माध्यमातून भरण्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कोरोना साथीमुळे मागील वर्षीच्या परीक्षांचे निकाल लागण्यास विलंब झाल्याने, बोर्डाकडून पुढील वर्षीच्या परीक्षेसाठी खबरदारी घेऊन तयारी सुरु करण्यात आली आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे चे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी याबाबत माहिती दिली. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेस वरून ऑनलाईन पद्धतीने भरता येतील. ही आवेदनपत्रे मंगळवार (दि. 15 डिसेंबर 2020) ते सोमवार (दि. 4 जानेवारी 2021) या कालावधीत नियमित शुल्कासह भरता येतील.
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी , श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने भरता येतील. ही आवेदनपत्रे मंगळवार (दि. 5 जानेवारी 2021) ते सोमवार (दि. 18 जानेवारी 2021) या कालावधीत नियमित शुल्कासह भरता येतील.
उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करून चलनाद्वारे बँकेत शुल्क भरण्याची मुदत मंगळवार (दि. 15 डिसेंबर 2020) ते सोमवार (दि. 25 जानेवारी 2021) पर्यंत आहे.
मार्च 2020 महिन्यात कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली. संचारबंदीचा कालावधी वाढविल्यामुळे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षाचे (बारावी) निकाल जुलै महिन्यात लागले. कोरोनाची स्थिती सावरली असली तरी संभाव्य अडचणी लक्षात घेऊन शिक्षण मंडळाने पुढील वर्षीच्या परीक्षांची तयारी सुरु केली आहे.

