पुणे:-आज होत असलेल्या भारत बंद दरम्यान शेतकरी आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन पुणे पोलिसांकडून शहरात अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व आंदोलनकर्त्यांशी योग्य प्रकारे समन्वय साधण्यात आला आहे.
आंदोलनकर्त्याना एकाच जागेवर निदर्शने करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती दक्षता घेतली असल्याची माहिती पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.
आंदोलन करताना कोणीही सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप होईल असे वर्तन करणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, हडपसर, सातवाडी, मार्केटयार्ड, धायरी फाटा, जिल्हा परिषद, मंडई, लक्ष्मी रस्ता परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. त्याठिकाणी पोलिसांकडून योग्य तो समन्वय ठेवण्यात आला आहे. भारत बंद संविधानिक मार्गाने व्हावा, सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता आंदोलनकर्त्यानी घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

