दिवसा ढवळ्या होणाऱ्या व पाच दिवस चालणाऱ्या तसेच काही प्रमाणात रटाळ व निरस खेळ होणाऱ्या कसोटी सामन्यांना प्रेक्षक जेंव्हा पाठ फिरवू लागला तेंव्हा आयसीसीने पारंपारीक क्रिकेट असणाऱ्या कसोटी क्रिकेटला वाचविण्यासाठी अनेक क्लृप्त्या शोधल्या त्यापैकी एक म्हणजे कसोटी क्रिकेट डे नाईट पध्दतीने खेळविणे ही होय. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून आयसीसीने सन २०१५ मध्ये कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिली दिवस रात्र कसोटी खेळायला परवानगी दिली. त्यानंतर गेल्या पाच वर्षात एकूण १४ डे नाईट कसोटी सामने निर्विघ्न पार पडले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ते सर्वच्या सर्व सामने निकाली निघाले असून सर्वाधिक सहा डे नाईट कसोटी खेळण्याचा मान ऑस्ट्रेलियाला मिळाला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने खेळलेले सर्वच्या सर्व सहा सामने जिंकून डे नाईट कसोटी क्रिकेटवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
याच पार्श्वभूमिवर भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला आहे. या दोन संघातील कसोटी मालिकेला गुरूवार दिनांक १७ डिसेंबर २०२० रोजी अॅडलेड येथे सुरूवात होत असून हा सामना दिवस रात्र पद्धतीने खेळविला जाणार आहे.
पाहुण्या भारतीय संघाचा हा दुसरा दिवस रात्र कसोटी सामना ठरणार असून यापूर्वी भारत मागच्याच वर्षी कोलकात्याच्या ईडन गार्डनवर बांगलादेश विरूध्द आपला पहिला डे नाईट सामना खेळला आहे. भारतानेही आपल्या डे नाईट कसोटी सामन्याचा श्रीगणेशा विजयाने केला आहे. भारत पहिल्यांदाच परदेशात डे नाईट कसोटी खेळत आहे. त्यातच भारताचा संघ काही प्रमुख खेळाडूंच्या दुखापती मळे अपंग वाटत असला तर विरोधी ऑस्ट्रेलियन संघाला देखील दुखापतीने ग्रासले आहे. त्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या या कसोटी
मालिकेत दोन्ही संघ समतोल वाटत आहे. मालिकेतला हा पहिला सामना कोण जिंकतो या कडे समस्त क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे. त्याच धर्तीवर यापूर्वी झालेल्या १४ दिवस रात्र कसोटयात कोणत्या संघाने काय पराक्रम केला ते आपण प्रस्तुत लेखात जाणून घेऊ या.
२७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१५ दरम्यान कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला पहिला दिवसरात्र सामना ऑस्ट्रेलिया व न्यूझिलंड यांच्या दरम्यान खेळला गेला. त्या सामन्यात कांगारूंनी किवीजवर तीन गडी राखून विजय मिळविला होता.
१३ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत पाकिस्तान व विंडीज यांच्यात दुबईच्या वाळवंटात दुसरी लढत झाली, ती पाकने ५६ धावांनी जिंकली.
ऑस्ट्रेलियातील अॅडलेड हे डे नाईट कसोटयांचे प्रमुख केंद्र बनले आहे. याच अॅडलेड ओव्हलवर ऑस्ट्रेलियाने २४ ते २८ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत द. आफ्रिकेला ७ गड्यांनी मात देत आपले डे नाईट सामन्यातील विजय अभियान सुरू ठेवले.
१५ ते १९ डिसेंबर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियातील वुलन गब्बावर यजमान कांगारू पाकिस्तान विरूध्द भिडले. त्या अतिटतीच्या सामन्यात पाकला केवळ ३९ धावा विजयासाठी कमी पडल्या होत्या.
इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान एजबॅस्टन येथे १७ ते २१ ऑगष्ट २०१७ या कालावधीत झालेल्या डे नाईट कसोटीत इंग्लंडने २०९ धावांनी बाजी मारली.
६ ते १० ऑक्टोबर या अवधीत दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर पाकिस्तान व श्रीलंका यांच्यात झालेला सामना श्रीलंकेने ६८ धावांनी जिंकला.
२ ते ६ डिसेंबर २०१७ दरम्यान अॅडलेड ओव्हलवर दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया आपसात भिडले. या सामन्यात इंग्लंडला १२० धावांनी पराभव स्विकारावा लागला.
२६ ते २९ डिसेंबर २०१७ च्या दरम्यान झालेल्या बॉक्सींग डे कसोटीत सेंट जॉर्जेस पार्क, पोर्ट एलिझााबेथ येथे द. आफ्रिकेेने झिंबाब्वेला एक डाव व १२० धावांनी लोळविलेे.
२२ ते २६ मार्च दरम्यान इंग्लंड व न्युझिलंड ऑकलंडच्या ईडन पार्कवर भिडले. त्यामध्ये इंग्लंडचा १ डाव व ४९ धावांनी न्यूझिलंडने धुव्वा उडविला.
२३ ते २७ जुन २०१८ दरम्यान किंग्सस्टन ओव्हल, ब्रिजटाऊन येथे जयमान विंडिज व पाहुण श्रीलंका यांच्यात झालेला सामना श्रीलंकेने ४ गडी राखून खिशात टाकला.
२४ ते २८ जानेवारी २०१९ दरम्यान ब्रिस्बेनच्या वुलन गब्बावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला १ डाव व ४० धावांनी लोळविले.
२२ ते २६ नोव्हेंबर २०१९ दरम्यान कोलकात्याच्या ईडन गार्डनवर भारताने आपल्या पहिल्या डे नाईट सामन्यात बांगलादेशला १ डाव व ४६ धावांनी नमविले.
२९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१९ या कालावधीत झालेल्या सामन्यात अॅडलेड येथे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला एक डाव व ४८ धावांनी हरविले.
१२ ते १६ डिसेंबर २०१९ दरम्यान पर्थ येथे ऑस्ट्रेलियाने न्यूझिलंडवर २९६ धावांनी विजय मिळविला.
९ ते १२ नोव्हेंबर २०१७ दरम्यान इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्या महिला संघात सिडनी येथे झालेला सामना अनिर्णित राहीला. महिलांच्या क्रिकेटमध्ये खेळलेला हा एकमेव डे नाईट कसोटी होता.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

