shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यंदा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार; आळंदीसह परिसरातील गावांमध्ये ६ ते १४ डिसेंबर संचारबंदी लागू..!!

पुणे:-कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदाचा संत ज्ञानेश्वर  महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकी वारीतील प्रमुख कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावेत असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि.४) उशिरा जारी केला आहे. विशेष म्हणजे तीर्थक्षेत्र आळंदीत भाविकांची गर्दी टाळण्यासाठी खबरदारी म्हणून आळंदीसह परिसरातील गावांत ६ ते १४ डिसेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्तिकीवारी कार्तिकी वद्य अष्टमी ८ डिसेंबरपासून भरणार आहे. आषाढी वद्य एकादशी ११ डिसेंबरला तर संजिवन समाधी सोहळा दिन कार्तिक वद्य त्रयोदशी १३ डिसेंबरला आहे. यापार्श्वभूमीवर पंढरपूरातून कार्तिकी वारीसाठी श्री पांडरुंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या मानाच्या तीन दिंड्यांना राज्य शासनाकडून प्रत्येकी वीस वारकऱ्यांना आळंदीत प्रवेशासाठी परवानगी दिली आहे. या तिन्ही दिंड्या ८ डिसेंबरला एसटीने आळंदीत दाखल होणार आहेत.  संचारबंदी काळात केवळ मंदिरात देवस्थानचे नैम्मित्तक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.

वारीकाळात कीर्तन, जागर, माऊलींच्या समाधीवरील नित्योपचार पूजा करण्यास अटी – शर्ती घालून परवानगी देण्यात आली आहे. तर यात्रा दरम्यान इंद्रायणी नदीत स्नान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. माउलींच्या महाद्वारातील गुरू हैबताबाबा पायरीपूजन परंपरेप्रमाणे होणार आहे. मात्र या पूजेला फक्त ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर इतर कार्यक्रमांना फक्त २० ते ३० जणांची उपस्थिती असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी देखील संचारबंदीचा आदेश दिला आहे. दि.०६ ते १४ डिसेबर रोजीपर्यंत आळंदी नगरपरिषद हद्द तसेच आळंदी शहराचे आजुबाजुचे केळगाव, च-होली खुर्द, च-होली बुद्रुक, चिंबळी, वडगाव घेनंद, कोयाळी तर्फे चाकण, धानोरे, सोळू, मरकळ, डुडुळगाव या गावांमध्ये फौजदारी प्रकिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत संचारबंदी आदेश लागु करण्यात आला आहे. या कालावधीत येथे जमावबंदी आदेश अंमलात राहतील. सदरवेळी सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास थांबण्यास, चर्चा करणेस मनाई राहील.

सदरचा आदेश खालील बाबींस लागु राहणार नाही.

१) अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविणारी खाजगी / सरकारी रुग्णालये, दवाखाने, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी व त्यांची वाहने, अॅम्ब्युलन्स सेवा तसेच SARI, ILI व Contact Tracing या संदर्भात सर्वेक्षण करणारे अधिकारी / कर्मचारी.

२) कायदेशीर कर्तव्य बजावत असणा-या शासकीय अधिकारी व कर्मचारी उदा.महसुल, पोलीस, पाणीपुरवठा, अग्निशामक, विद्युत पुरवठा इ. विभागातील कार्यरत अधिकारी/कर्मचारी.

३) जीवनावश्यक सेवेतील आस्थापना उदा. दुध, फळे, भाजीपाला, किराणा, पिण्याचे पाणी घरोघरी जारद्वारे पुरवठा करणारी यंत्रणा तसेच घरगुती स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे सिलेंडर पुरवणारी यंत्रणा.

४) मंदिर समिती आळंदीचे पासधारक अधिकारी/कर्मचारी.

५) पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यक असणा-या सुविधा पुरविणा-या यंत्रणा. (उदा.भोजनालय, पाणी पुरवठा इ.)

६) कार्तिकवारी कालावधीमध्ये पुर्वापार परंपरेनुसार साजरे होणारे उत्सव यांना स्थानिक परिस्थितीनुरुप परवानगी देण्याचे अधिकार राखुन ठेवण्यात येत आहेत.

७) सदर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० नुसार आणि साथीचे रोग कायदा १८९७ तसेच प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

८) उपरोक्त ठिकाणी सर्व संबंधितांना आदेशापुर्वी स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहीती प्रसार माध्यमे, पोलीस स्टेशन, सहा.पोलीस आयुक्त, परिमंडलीय पोलीस उपायुक्त कार्यालय यांचे नोटीस बोर्डवर नागरीकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
close