आयपीएलचे तेरावे सत्र संपल्यानंतर भारताचा संघ तिन वनडे, तिन टि-२० व ४ कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या लांबलचक दौऱ्यावर गेला. रोहीत शर्मा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार या प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे या महत्वाच्या दौऱ्यावर जाता आले नाही. त्यामुळे या अवघड दौऱ्यावर भारताचे पारडे सुरुवातीलाच झुकल्याचे दिसत होते. त्यातच आयपीएल मध्ये खोऱ्याने धावा ओढणाऱ्या सुर्यकुमार यादव व इशान किशन यांना डावलल्याने संघ कमकुवत जाणवू लागला होता.
त्याच धर्तीवर दौऱ्याची सुरूवात एकदिवसीय मालिकेने झाली. पहिल्या दोन वनडे सामन्यांबरोबरच मालिका गमवाव्या लागलेल्या भारताला तिसऱ्या वनडेत विजय मिळाला व ३-० असं काळं तोंड होण्यापासून वाचण्यास मदत झाली. तिसऱ्या वनडेत नवोदित जलदगती गोलंदाज टि नटराजनने यशस्वी पदार्पण करून भारताचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विजयाचं खातं उघडण्यात सहाय्य केलं. भारतासाठी स्वारस्य संपलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील विजयाने टि-२० मालिकेसाठी भारतीय संघाला नव संजीवनी मिळाली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टि -२० मालिकेतील पहिल्या सामन्यात टि नटराजनने पदार्पण पुन्हा एकदा झोकदार केले. तोच जोर त्याने राहिलेल्या दोन्ही सामन्यात लावला मात्र तिसऱ्या सामन्यात त्याच्या इतर सहकाऱ्यांनी खेळाच्या सर्वच क्षेत्रात निराशा केल्याने भारताला तिसऱ्या टि २० सामन्यात निसटता पराभव स्विकारावा लागला. अन्यथा ऑस्ट्रेलियावर मालिकेतील सर्व सामने गमावून ब्लॅकवॉश स्विकारण्याची वेळ आली असती. टि नटराजन खऱ्या अर्थाने या दौऱ्याची फार मोठी खोज ठरला आहे.
दौऱ्याच्या सुरुवातीलाच खेळाडूंच्या दुखापतीने त्रस्त भारताला भरवशाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या दुखापतीने संकटात टाकले असून कसोटी मालिकेसाठी त्याची अनुपस्थिती भारतासाठी त्रासदायक ठरू शकते.
टि-२० मालिकेचा विचार केला तर ऑस्ट्रेलियाचे डेव्हीड वॉर्नर, पॅट कमिन्स व मिचेल स्टार्क उपलब्ध नव्हते. तर भारतानेही उपलब्ध संघातील मोहम्मद शमी, जसप्रित बुमराहा यांना विश्रांती देऊन मामला समतोल केला. परंतु नटराजनने भारताचे पारडे वरचढ केल्याने भारताला २-१ का होईना मालिका खिशात घालता आली. तिसऱ्या सामन्यातील पराभवाने भारताची सलग दहा विजयांची मालिका खंडीत व्हावी लागली. तर सिडनीच्या मैदानावरील मागील तीन पैकी तीन विजयांची मालिकाही तुटली.
तिसरा सामना भारतासाठी जिंकणे फारसे अवघड नव्हते. परंतु गचाळ क्षेत्ररक्षण, नटराजन वगळता इतर गोलंदाजांची स्वैर गोलंदाजी, केएल राहुल, श्रेयस अय्यरचे शुन्यावर बाद होणे, संजू सॅमसनचे पुन्हा एकदा संधी मातीमोल करणे तसेच महत्वाच्या व निर्णायक क्षणी कर्णधार कोहली व हार्दिक पंडयाचे बाद होणे संघाच्या मुळावर आले. तरीही शार्दूल ठाकूरने आशा जिवंत ठेवल्या होत्या. परंतु त्याचे प्रयत्न तोकडे पडले. मात्र मालिका विजय झाल्यामुळे हा पराभव विसरला जाईल. पण हि मालिका ऑस्ट्रेलियाला क्लिन स्वीप देऊन जिंकता आली असती तर कसोटी मालिकेसाठी वाढलेल्या मनोधैर्याने जाता आले असते. चला जाऊ दया. आज अखेर तरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोन्ही संघ एक एक मालिका जिंकून बरोबरीवर आहेत. त्यामुळे येत्या १७ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या मालिकेत काय होईल ? याबाबत सर्वांच्या उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचल्या असतील ?
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

