shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिवस रात्र कसोटीत पहिल्या डावात भारतीय फलंदाज अंधारात..!!



             भारत सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून या भरगच्च दौऱ्यात झालेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने  व  टि २० मालिकेत भारताने बाजी मारून आपली इज्जत राखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर होणारी चार कसोटी सामन्यांची मालिका दोन्ही संघाना कसोटीच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी महत्वाची ठरणार असल्याने आपले वर्चस्व सिध्द करण्याचा दोन्ही संघ प्रयत्न करणार हे शंभर टक्के खरं आहे.

              याच पार्श्वभूमिवर अॅडलेड ओव्हलवर पहिला कसोटी सामना सुरू झाला तो गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या दिवस रात्र सामन्याच्या रूपात. या सामन्यात भारतीय संघ प्रबंधनाने एक अतिशय धाडसी निर्णय घेताना सामन्याच्या एक दिवस अगोदर आपला अकरा जणांचा अंतिम संघ जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. परंतु संघ निवड करताना भारतीय संघ व्यवस्थापनाने फॉर्मात नसलेला सलामीवीर पृथ्वी शॉला पहिली पसंती दिली व फॉर्मात असलेल्या शुभमन गिल व अनुभवी के एल राहुलला राखीव खेळाडूत बसविले. या बाबी ला देशविदेशातल्या तमाम क्रिकेट पंडित, क्रिकेटपटूंनी विरोध दर्शविला. मात्र संघ व्यवस्थापनाचा निर्णय बदलला नाही.
                    परंतु जेंव्हा प्रत्यक्ष सामना सुरू झाला तेंव्हा सर्वांच्या मनात असलेली भिती शब्दशःखरी ठरली. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर मिचेल स्टार्कचा आतमध्ये येणारा चेंडू न समजल्याने सलामीवीर पृथ्वी शॉ आल्या पावली माघारी फिरला. याचा अर्थ भारत एक गडी आधीच गमावून खेळत असल्यासारखे मैदानात उतरला. ही अनेकांची शंका खरी ठरली.
                     पृथ्वीच्या पतनानंतर कांगारूंनी भारतीय फलंदाजांभोवतीचा फास जोरात आवळला. त्या चक्रव्यूहात दुसरा सलामीवीर मयंक अग्रवाल देखील अडकला व स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कसोटीचा तज्ञ फलंदाज चेतेश्वर पुजारा व कर्णधार विराट कोहलीने डाव सावरला असे वाटत असतानाच पुजारा फिरकी गोलंदाज नाथन लियॉनच्या जाळ्यात अडकला व आपला विक पाँईट असलेल्या लेग स्लीप मध्ये झेल देऊन बसला. वास्तविक ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं अपिल मैदानातील पंचांनी नाकारले होते. परंतु पुजारा स्वतःला बाद मानून बाहेर जाऊ लागताच पंचांनी त्याला थांबविले, पुजाराच्या याच प्रामाणिक पणाचा गैरफायदा घेत कांगारूंनी डिआरएस घेतला. त्यामध्ये बॉल पुजाराच्या बॅटला चाटून गेल्याचे समजताच पुजारासाठी पॅव्हेलियनचे दरवाजे उघडले गेले व भारताच्या डावात अंधार पडण्याची भिती निर्माण झाली होती. कारण पुजारा भारताचा मुख्य आधारस्तंभ आहे.
                        पुजाराच्या पतनानंतर आलेल्या उपकर्णधार अजिंक्य राहाणनेही विश्वसनीय खेळ केला खरा, परंतु त्याच्या चुकीमुळे शतकाकडे वाटचाल करू पाहणारा कर्णधार विराट कोहली धावबाद झाला. हे कमी की काय म्हणून थोडयाच वेळाने राहाणेही पायचित होऊन परतला. त्यानंतर मोठ्या विश्वासाने संघात घेतलेला हनुमान विहारी फार काही न करता परतल्याने भारतीय संघापुढे अंधकार पसरला. परंतु रिषभ पंतला डावलून संघात घेतलेल्या यष्टीरक्षक वृध्दीमान साहाने अष्टपैलू रविचंद्रन आश्विनच्या साह्याने भारताला सुखरूप तंबूत नेले.
                      शुक्रवारी सकाळी साहा- अश्वीन जोडीने कमीत कमी ५० धावा जरी केल्या तरी भारत फायटींग स्कोअर उभा करू शकतो व त्यानंतर भारताचे गोलंदाज आपले कर्तव्य पार पाडण्यास सक्षम आहेत. हे ऑस्ट्रेलियन संघही चांगल्यापैकी जाणून आहे. त्यामुळे सामन्याच्या पहिल्या दिवसाअखेर भारतीय फलंदाज अंधारात असले तरी भारतासाठी सामना अजूनही जिवंत आहे. शेवटी क्रिकेट हा शेवटचा चेंडू पडेपर्यंत न संपणारा खेळ असून त्याच्यातील अनिश्चितता प्रत्येकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणार आहे.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close