स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुलेंच मोठं योगदान...माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे..!!
इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार )
इंदापूर :-(३ जाने.२१) स्त्री शिक्षण आणि महिला सबलीकरणासाठी" क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे फार मोठे योगदान असल्याचे मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष व इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी भिमाई आश्रमशाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी आपले मत व्यक्त केले.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक आश्रमशाळा, माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनिअर कॉलेज तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन भिमाई आश्रमशाळेत करण्यात आले होते. याप्रसंगी सावित्रीबाईंच्या प्रतिमेस संस्थेच्या संचालिका मा. शकुंतला मखरे (माजी नगरसेविका, नगरपालिका इंदापूर ) यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी बोलताना रत्नाकर मखरे म्हणाले की, सावित्रीबाई फुले जयंती ही "महिला शिक्षण दिन" म्हणून साजरा करत असताना त्यांचे कार्य ,विचार आणि योगदान हे सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षक वर्गाची आहे.
तसेच विद्यार्थ्यांनी देखील शाळेमध्ये भाषण, वक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा, परिसंवाद आणि एकांकिका यासारख्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे.यासाठी महाराष्ट्रातील शाळांमध्ये नावीन्यपूर्ण नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबविले गेले पाहिजे.जेणे करून विद्यार्थ्यांना बहुजन महापुरुष आणि महामाता यांचे कार्य आणि विचार माहिती होतील.
मखरे पुढे म्हणाले की,समाजात स्त्री- पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्री मुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे भारतीय इतिहासातील ज्योतिराव व सावित्रीबाई फुले हे पहिले दांपत्य होय. स्री शिक्षणाच्या अग्रदूत आणि स्त्री स्वातंत्र्याच्या प्रणेत्या ह्या खऱ्या अर्थाने सावित्रीबाईच आहेत. अज्ञान, जातीभेद, स्त्रीपुरुष भेदाभेद मिटविण्यासाठी फुले दांपत्यांनी १ जानेवारी १८४८रोजी पुणे येथे भिडे वाड्यात पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली. तेथे पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंनी काम केले. जोतिरावांच्या समता , सत्यपरायणता व मानवतावाद या तत्त्वांचा अंगीकार करून त्यासाठी सावित्रीबाईंनी आपले सर्व जीवन व्यतीत केलं. सावित्रीबाईनी स्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी तसेच महिला सबलीकरणासाठी निकराचे प्रयत्न केले.
शैक्षणिक क्षेत्रासह समाजातील अनिष्ट चालीरितींना आळा घालण्यासाठी सावित्रीबाईंनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले असल्याचे शेवटी मखरे यांनी म्हटले आहे.
दिग्विजय गायकवाड (१० वी), लक्ष्मण मांजरे (१० वी), श्रद्धा गायकवाड (११ विज्ञान),दिपाली काळे (१२वी विज्ञान) ह्या विद्यार्थ्याची भाषणं झाली.
महिला शिक्षकांनी आपले विचार व्यक्त केले. मनिषा जगताप- मखरे मॅडम म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी महिलांना सन्मानाच जीवन जगण्याचा मौलिक अधिकार मिळण्याकामी शिक्षणावर भर दिला. म्हणूनच आजची आधुनिक स्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे श्रेय सावित्रीबाई फुलेंनाच जाते.
उपप्राचार्या सविता गोफणे मॅडम म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांची जयंती ही "बालिका दिन" म्हणून साजरी होत असताना आपल्याला अभिमान वाटत असून मुलींनी शालेय स्तरावर होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला पाहिजे.
मुख्याध्याक साहेबराव पवार म्हणाले की, सावित्रीबाई फुलेंनी प्लेगच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचविण्यात धन्यता मानली.
संस्थेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासठी शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे तंतोतंत पालन कार्यक्रम स्थळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
सदर कार्यक्रम प्राचार्या अनिता साळवे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

