हरिहरेश्वरला श्री मच्छिंद्रनाथ आले!
एका बाजूला उंच डोंगर व दुसऱ्या बाजूला डोंगराच्या पायथ्याशी खेळकर समुद्र!
हिरवगार निसर्ग सौंदर्याने मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले.
गदातीर्थावर येवुन स्नान करून मच्छिंद्रनाथ हरिहरेश्वरच्या दर्शनाला जाण्यासाठी मुद्रा धारण करू लागले तोच तेथे वीरभद्र आला व त्याने आपली सारी शस्त्रे, त्रिशूळ, डमरू, धनुष्यबाण बाजूला ठेवले.
तोच वेगळा वेश धारण करणारा साधू पाहून त्याने त्याला विचारले!
कोण आपण...?
मी मच्छिंद्रनाथ!
आपला पंथ ?
नाथ पंथ
हा कसला वेश ?
ह्या नाथ पंथाच्या मुद्रा आहेत
मुद्रा ?
हो ही शैली, श्रुंगी, पुंगी, मेखला, शंख!
ही वेगळीच लक्षण आहेत!
वीरभद्र हसत म्हणाला.
सनातनी संन्यास अधर्माचे आचरण सोडून हे कसले पंथ वेड ?
हे पंथ वेड नाही!
तर धर्माचे वेड काढायची शक्ती आहे!
ह्यात कसली आली आहे शक्ती ?
हे काय छातीला गुंडाळले आहेस ?
त्यांत शक्ती आहे काय "
मिस्किलपणे हसत वीरभद्र म्हणाला!
ही मेखला आहे!
मच्छिंद्रनाथ विनयानं म्हणाला!
हा असला विचित्र पोशाख करून पंथ चालविण्यापेक्षा सरळ सनातन धर्माचे का नाही पालन करीत ?
सनातन धर्म ?
काय आहे त्या धर्मात ?
रागानं मच्छिंद्रनाथानं प्रश्न केला.
ब्रह्म आणि पर ब्रह्माचा साक्षात्कार आहे त्यात!
साक्षात्कार का इतिहास आहे त्यात ?
मच्छिंद्रनाथ पुन्हा रागानेच म्हणाले!
सनातन धर्म वेदांत आहे!
वेद इतिहास आहे हे तरी आपल्याला माहित आहे का ?
दास आणि दास्यू ह्यामधील स्पर्धे चा इतिहास म्हटलं तर काही चूकलं का ?
वर्णाचाराचं मुळच आहे त्यांत ते चटकन दिसत नाही !
वेद दार्शनिक आहेत!
दार्शन शास्त्रांत सांख्य वा वेदाना हेच प्रधान विचार आहेत!
"सांख्य हाहि वेदान्त विचार आहेत" -वीरभद्र रागावून म्हणाला.
तर्क शास्त्राच्या भाषेत ते तत्त्वज्ञान आहे!
आत्मज्ञान नाही त्यांत ?
आत्माचं विवरण शब्दानं नाही होत!
मग कशानं होत ?
ह्या अशा विचित्र वेशानं ?
-रागानं वीरभद्र म्हणाला.
अलबत! ह्या विचित्र वेशातच आत्मज्ञान अनुभूति प्रमाण आहे तर्क प्रमाण नाही!
शास्त्र प्रमाण नाही!
आत्मज्ञान अनुभूति प्रमाण आहे कसे ?
वीरभद्र आवेशाने म्हणून मच्छिंद्रनाथाजवळ आला.
आत्मज्ञान अनुभूती प्रमाण आहे कारण हे आत्मज्ञान गुरुवाणीचे आहे!
आणि गुरुवाणी सिद्धांतात स्वानुभूतीत आहे!
इतका दंभ सिद्धांताचा आहे असा गुरु तरी कोण ?
अस उद्दामपणे प्रश्न वीरभद्राने वीरभद्राने विचारताच मच्छिंद्रनाथांनाहि राग आला ते म्हणाले
"वेदांताच्या भाषेला गुरूचं महत्त्व काय कळणार ?
जा स्नानादि सर्व कर्मेठ कर्मे करून हरि हरेश्वराच्या दर्शनाला जा.
आत्मारामाला न ओळखणारे दगडीरामाला काय ओळखणार ?
मच्छिंद्रनाथ रागानेच म्हणाले.
अरे! अधमा! आताच तुला दाखवतो वेदान्ताचा- सनातन धर्माचा प्रताप!
असं म्हणून वीरभद्र शस्त्र ठेवीत होता तिथे गेला व त्याने अर्धचंद्र निर्वाण बाण काढून तो धनुष्याला लावला.
इकडे मच्छिंद्रनाथंनी त्वरीत वज्रास्त्र अभिमंत्रून झोळीतले भस्म फुंकले.
तो मंत्रप्रयोग पूरा होताच वीरभद्राने सोडलेला बाण आकाशात भ्रमण करू लागला हे पाहून वीरभद्र अधिकच रागावला.
मच्छिंद्रनाथाशांच्या वज्रशक्तिने बाणाचा चूरा केलेला पाहून वीरभद्राने दुसरा बाण सोडला.
ते नागास्त्र होते!
नागास्त्राची योजना वीरभद्राने केली आहे हे लक्षात येताच मच्छिंद्रनाथाने रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्र सोडले!
ह्या महाप्रवल अस्त्रा पुढे वीरभद्राच्या नागास्त्राचे काहीच चालेना.
त्यावेळी वीरभद्राने वातास्त्र सोडले.
मच्छिंद्रनाथांनी वातास्त्राचा नाश पर्वआस्त्र योजून केला!
दोघेहि अस्त्रविद्येतहि कुशल योद्धे
युद्धानं भयंकर रूप धारण केलं.
देवदेवतांना चिंता वाटू लागली.
पृथ्वीवर कलियुगांत अस्त्राच्या युद्धाचे प्रयोजन काय म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश हे आकाशात येऊन पृथ्वीतलावरील योध्द्यांकडे पाहू लागले.
तर त्यांच्या लक्षात आले की वीरभद्र व मच्छिंद्रनाथ यांच्यात हे युद्ध चालले आहे.
त्यावेळी ब्रम्हा, विष्णू, महेश हे तिघेही गदातीर्थी आले व मच्छिंद्रनाथ व वीरभद्र ह्यांचे युद्ध थांबवून त्यांच्यात सख्य करून दिले.
त्यावेळी मच्छिंद्रनाथ म्हणाले, ब्रम्हा, विष्णू, महेश गुरुदेव- नमस्कार!
वीरभद्राला माझा गुरु कोण हे जाणून घ्यायचं होतं ते सांगा आता!
ब्रम्हा-विष्णू-महेशांचा रज तम सत्व गुणांचा आदर्श हाच मच्छिंद्राचा गुरु! -महेश म्हणाले.
कोण दत्तयोगी!
वीरभद्र आश्चर्याने म्हणाला!
हो दत्तयोगी!
महेश म्हणाले!
कलियुगांत कलिच्या उन्मादाने जे जीव बेजार होतील व धर्माला जे अधर्माचे रुप येईल ते घालविण्यासाठी नाथ पंथाची स्थापना मच्छिंद्रनाथाकडून दत्तयोगी गुरुने केली आहे!
पण हा पोशाख असा का ?
वीरभद्राने पुनः प्रश्न केला.
त्यावेळी हसत विष्णू म्हणाले.
वीरभद्रा ह्या पोशाखाचे गूढ तो परिधान केल्या शिवाय कळणार नाही!
नाथपंथाचे वैशिष्ट्य जसे तपस्येत आहे तसे ह्या पोशाखात हि आहे!
"पण हा पंथ तर सनातन धर्माला मानित नाही" वीरभद्र जरा जोरानेच म्हणाला.
हा पंथ सनातन धर्माचा परिपाक आहे वत्सा!
महेश म्हणाले.
पण मच्छिंद्रनाथांनी तर निर्भत्सना केली ह्या धर्माची!
वीरभद्र रागाने म्हणाला.
मच्छिंद्रनाथ शांतपणे हात जोडून उभे होते.
त्यांच्याकडे पहात महाविष्णू म्हणाले.
मच्छिंद्रनाथा, खरं आहे हे ?
भगवंता, सनातन धर्माची सनातन अवस्थाच ज्याला माहिती नाही त्याला मी काय सांगणार ?
बघा भगवंता!
कसा मच्छिंद्रनाथ म्हणतोय ते.
आता सनातन धर्माच्या अवस्थेवर आला!
सनातन धर्म ब्रह्मरूप आहे पण ब्रह्मरूपाचा वेदान्त सिद्धांतात आहे, हे कसं सांगू भगवंता!
मच्छिंद्रनाथ म्हणाले व थोडे भावनावश होऊन भगवंतांना विनयान नमस्कार करून म्हणाले, गुरु कंठातील वाणी सिद्धांत आहे.
या सिद्धान्ती धर्मापेक्षा श्रेष्ठ धर्म तरी कोणता ?
छान! मच्छिंद्रनाथ! सिद्धांताचा खरा अद्याचार्य शोभतोस!
-असं म्हणत महेशाने मच्छिंद्रनाथांच्या पाठी वरुन क्रुपाप्रसादाचा हात फिरविला व म्हणाले, वीरभद्रा, कलियुगांत नाथपंथ हाच खरा सनातनी धर्म असेल.
खरी धर्म संज्ञा ह्याच पंथात, सिद्धांतवाणी असतील!
मच्छिंद्रनाथाशी सख्य कर!
अस म्हणून महेशाने वीरभद्रालाहि जवळ घेतले!
सारी दैवतं प्रसन्नतेने हसली व मच्छिंद्रनाथाला आशीर्वाद दिला.
वीरभद्राने प्रेमाने मच्छिंद्रनाथाला आलिंगन दिले त्यावेळी मच्छिंद्रनाथ वीरभद्राच्या कानात म्हणाले, विरभद्रा, माझ्या शाबरी काव्याला तुझे सहाय्य हवं!
जरूर सहाय्य असेल माझं!
माझ्यावर जी कामगिरी सोपविली असेल ती मी करीन!
वीरभद्राचे अभिवचन मिळाल्यावर मच्छिंद्रनाथाने विनयाने व भक्तिने सर्व दैवतांना नमस्कार केला.
विष्णू भगवंताने जाताना म्हटले, मच्छिंद्रनाथा, माझं स्मरण करताच मी तुझ्या सहाय्याला धावून येईन!
व तुझ्या कार्यासाठी हे चक्रास्त्र घे!
-असे म्हणून महा विष्णूने चक्रास्त्र दिले.
ब्रह्मदेवांनी शापास्त्र व इंद्राने वज्रास्त्र दिले!
सर्वदेवांनी प्रसन्नतेने वर दिले!
वीरभद्राला पुन्हा जवळ घेत महेश म्हणाले, पुत्रा हा कविनारायण आहे हे विसरू नकोस व त्याला पाहिजे तेव्हा सहाय्य कर, सिद्धांताचा तो आद्याचार्य आहे!
मच्छिंद्रनाथा, माझ्याकडून हे त्रिशूलास्त्र घे!
-असं म्हणून महादेवाने त्रिशूलास्त्र दिले व तेही निघून गेले!
वीरभद्र पुन्हा प्रेमानं आलिंगन देऊन निघून गेला.
मच्छिंद्रनाथांनी दोन्ही झोळ्या काखोटीला लावल्या व ते चालू लागले.
समुद्राचा खळखळाट ऐकु येत होता.
तसाच नाथांच्या घुंगुराचाहि आवाज ऐकू येत होता!
आणि त्या नादब्रह्मातच मच्छिंद्रनाथ गुरुध्यानांत मार्गक्रमण करीत होते!
लेखक-सद्गुरु श्री देवेंद्रनाथ
संदर्भ-"सद्गुरु श्री देवेंद्रनाथ" यांच्या 'अलख निरंजन १९७७'मधून
श्री देवेंद्रनाथ शिष्य- ९८२२२५४१९०
जय सद्गुरू श्री देवेंद्रनाथ💐🙏🏻

