भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोनावरील उत्तम लस तयार करून जगाला दिल्याचा अभिमान - हर्षवर्धन पाटील..!!
इंदापूर प्रतिनिधी:कोरोना पार्श्वभूमीवर भारतातील सर्व शास्त्रज्ञांनी जगाला लागेल अशी कोरोना वरील उत्तम लस तयार करण्याचे काम केले असल्याने याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त इंदापूर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहन करण्यात आले.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी उत्कृष्ट संचलन केले. उत्कृष्ट कार्य केलेल्या राष्ट्रीय छात्र विद्यार्थ्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी प्रांगणात सर्वसमावेशक अशी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रतिकृती रांगोळीच्या साहाय्याने साकारण्यात आली होती.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' २६ जानेवारी १९५० मध्ये भारताने पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटना लिहिण्याकरता त्यांना २ वर्ष ११ महिने १८ दिवस इतका कालावधी लागला. त्यांनी या देशाची सुंदर अशी घटना लिहिली ज्या घटनेच्या आधारावर आपला देश लोकशाहीच्या मार्गाने प्रशासन कारभार करीत आहे. गेल्या वर्षभरामध्ये कोरोना पार्श्वभूमीवर मोठ्या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागला मात्र याही परिस्थितीत भारतातील सर्व शास्त्रज्ञांनी जगाला लागेल अशी कोरोना वरील उत्तम लस तयार करण्याचे काम केले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. राष्ट्रप्रेम, राष्ट्रशक्ती,राष्ट्रनिष्ठा ही भारत माता माझी भूमी आहे माझी आई आहे तिची मरेपर्यंत सेवा करेल अशी संकल्पना करून ती जोपासणे ही काळाची गरज आहे. जगाच्या सर्वोच्च क्षेत्रात कार्य करणारे डॉक्टर, शास्त्रज्ञ, आयटी इंजिनियर तसेच सेवा, दळणवळण क्षेत्रातील व्यक्ती हे भारतातील आहेत हे भारताच्या दृष्टीने अभिमानास्पद कामगिरी आहे.'
यावेळी संस्थेचे सचिव मुकुंद शहा, सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, खजिनदार ॲड. मनोहर चौधरी, विकास मोरे, प्रशांत शेटे, राकेश शुक्ल, राजेंद्र पवार, क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ,डॉ. शिवाजी वीर,डॉ. भिमाजी भोर,डॉ. सदाशिव उंबरदंड,प्रा.बापू घोगरे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लेफ्टनंट बाळासाहेब काळे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी आभार मानले.

