संगमनेर। प्रतिनिधी(ऋषिकेश जगताप):
पुणे-नाशिक महामार्गावर कंटेनरच्या धडकेत ४ जण जखमी झाले तर एका १०महिन्याच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला...!
सदर घटना दि. १०/१/२०२१ ला
दुपारी २:३० वाजायच्या सुमारास घडली आहे. घारगाव पोलिसांच्या माहितीनुसार नामदेव अंकुश पारधी , व त्यांची पत्नी मंगल नामदेव पारधी हे काटवन वाडी डोळासणे येथील राहणार असून ते रविवारी दुपारी आपली १० महिन्याची चिमुकली प्रतिक्षा ही आजारी असल्याने तिला आपल्या दुचाकीवर घेऊन घारगाव येथील दवाखान्यात आले होते.
दवाखान्यात औषध उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा घारगाव वरून डोळासणेकडे जात होते. त्याच दरम्यान घारगाव येथील बस स्थानकाजवळ आले असता मालवाहतूक कंटेनर क्रमांक TN02BL6729 यांनी पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिली. तेव्हा मंगल यांच्या हातातून प्रतिक्षा सटकली आणि ती महामार्गावर पडली. त्यात तिच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघातात दोघे पती-पत्नी ही जखमी झाले व त्याच दरम्यान काही अंतरावर उभे असलेले, नवनाथ सखाराम गाडगे व शिवाजी रामचंद्र भागवत या दोघांनाही कंटेनरने जोराची धडक दिली. तर याच घटनेत चार जण जखमी झाले. एका दहा महिन्याच्या चिमुकलीने आपला जीव गमावला सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

