shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जखमी भारतीय खेळाडूंनी सर्वगुण संपन्न ऑस्ट्रेलियन संघाचा उडविला फज्जा..!!


                          
                         भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताला अपमानास्पदरित्या हरविल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला आकाश ठेंगणं झालं होतं. त्यातच भारताचा प्रमुख फलंदाज व कर्णधार विराट कोहली कौटुंबिक कारणास्ताव मायदेशी परतल्यानंतर त्यांचा आंनद गगनात मावेनासा झाला होता. शिवाय भारताचा प्रमुख गोलंदाजा मोहम्मद शमीला शरीरवेधी गोलंदाजी करून जायबंदी केल्यानंतर त्यांना रान मोकळं झाल्यासारखं वाटलं होतं. 

                       परंतु त्या पराभवानंतर बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघात अमूलाग्र बदल झाले. कर्णधार अजिंक्य राहाणेने स्वतः आदर्शवत खेळ करून संघाची मोट बांधली व कांगारूंना जोरदार झटका दिला. त्या पराभवाने कांगारूंच्या पायाखालची जमीनच हादरली !  ऑस्ट्रेलियन संघातील प्रत्येक खेळाडूसह तेथील प्रसारमाध्यमे, सरकार, प्रेक्षक हवालदिल झाले. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पाच  भारतीय खेळाडूंना कोविड-१९ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी टारगेट केले गेले. त्यावेळी भारतीय  संघ प्रबंधन व बीसीसीआयने त्यांची योग्य पाठराखण केल्याने ते तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकले. एवढेच नाही त्यांच्या क्रिडामंत्र्यानेही भारताने चौथ्या कसोटीत ब्रिस्बेनला खेळण्याच्या वादात उडी घेतली.

                  त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनीही भारतीय खेळाडूंवर टिकेची राळ उठवली. तेथील समाज माध्यमही मागे नव्हते. ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी भारताच्या काही खेळाडूंची अवास्तव स्तुती करून त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढविण्याचा प्रयत्न केला. सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना मानसिकदृष्टया जेवढे जेरीस आणता येईल तेवढे आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
                     जेंव्हा प्रत्यक्ष सिडनी कसोटीला झाली तेंव्हा भारतीय खेळाडूंबाबत त्यांनी वेगळीच रणनिती आखली. सिमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारतीय खेळाडूंना तेथील प्रेक्षक अभ्रद्र व अर्वाच्य भाषेत खिजवत होते. यानेही भारतीय खेळाडू हटत नाही म्हंटल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना शारिरीक इजा होईल अशी शरिरवेधी (बॉडीलाईन ) गोलंदाजी केली. त्यामध्ये रिषभ पंत व रविंद्र जडेजा जायबंदी झाले तर तळाकडच्या फलंदाजांवर जीवघेणे उसळते चेंडू सोडले वास्तविक जगातील कोणताच संघ तळाकडील फलंदाजावर उसळते चेंडू सोडत नाही.    
                     भारतात फार मोठी इज्जत मिळत असलेला ऑस्ट्रेलियाचा स्टिव्हन स्मिथ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध चेंडूच्या छेडखानी प्रकरणी एक वर्ष बंदी भोगली तरी त्याच्या नालायक हरकतींना बाज आला नाही. सामन्याच्या पाचव्या दिवशी रिषभ पंत जबरदस्त खेळी करत असल्याचे बघून स्मिथने रिषभ पंतच्या मार्किंग केलेल्या बॅटींग क्रिझवर पायाने खाडाखोड केली व तेथे त्याच्या पायाने नवीन रेष आखली. जेणे करून रिषभचा स्टान्स घेताना गोंधळ होऊन लगेच बाद व्हावा.  
                        या सामन्यात ऑस्ट्रेलियन पंचानी तर कहरच केला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अपिल केलेल्या प्रत्येक चेंडूवर त्यांना भारतीय फलंदाज बाद वाटायचे. तर भारतीय गोलंदाजांचं प्रत्येक अपिल त्यांना पोरकट वाटायचं. पॉल रायफल व पॉल विल्सन या मैदानावरील पंचानी तर अतिशय दर्जाहीन पंचगिरी करत पंच जातीला काळीमा फासली.
                        संपूर्ण सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी स्लेजिंग करुन खिजविण्याचा प्रयत्न केला. त्यांचा कर्णधार टिम पेनने या वायफळ बडबडीच्या नादात भारताच्या दुसऱ्या डावात ३ ते ४ झेल सोडून स्वतःच्याच संघाला वेदना दिल्या.
                        भारताचे प्रमुख नऊ खेळाडू या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकले नाहीत अथवा खेळले नाहीत. रिषभ पंत, रविंद्र जडेजा व हनुमान विहारी या सामन्यात ज्या जिगरीने खेळले त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच म्हणावे लागेल. 
                         नवोदित सलामीवीर शुभमन गिल, एक वर्षापेक्षा अधिक कालावधी नंतर कसोटी संघात परतल्यानंतर रोहीत शर्मा, चेतेश्वर पुजारा, हनुमान विहारी, रवीचंद्रन आश्वीन व रिषभ पंतने दुसऱ्या डावात निर्णायक क्षणी केलेला खेळ क्रिकेट रसिकांच्या कायम स्मरणात राहिल. जखमी व नवोदित खेळाडूंचा भरणा असलेल्या भारताने भले हा सामना जिंकला नसला तरी ज्या तडफेने पूर्ण क्षमतेने खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा सामना केला व त्यांचे सर्वच ठिकाणी पितळ उघडे पाडले. तेंव्हा हा अनिर्णित राहीलेला सामना सुध्दा विजयापेक्षाही मौल्यवान ठरला.
                      नियमित कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत संघाची धुरा वाहणाऱ्या हंगामी कर्णधार अजिंक्य राहणेने आपल्या नेतृत्व क्षमतेने समस्त क्रिकेट जगताला स्तिमित केले. राहाणेने नेतृत्व केलेल्या चार सामन्यात एकदाही त्याला पराभव स्विकारावा लागला नाही ही त्याची फार मोठी कामगिरी म्हणावी लागेल.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close