भारतीय जनता पार्टी राज्यातील दलित समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी - महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव..!!
इंदापूर:प्रतिनिधी:( दि.1३ जाने.२१)रेडणी येथील प्रफुल्ल तानाजी चव्हाण या दलित युवकावर दाखल करण्यात आलेला दरोड्याचा खोटा गुन्हा तसेच प्रफुल्ल चव्हाण यांना अन्यायकारक वागणूक देऊन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेली अश्लील भाषेतील शिवीगाळ ही पुरोगामी महाराष्ट्र राज्याला न शोभणारी व काळीमा फासणारी आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी इंदापूर येथे मंगळवारी (दि.१२) पत्रकार परिषदेत केली.
ते पुढे म्हणाले, राज्यातील दलित समाजावर महाआघाडी सरकार कडून अन्याय होत आहे, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. भारतीय जनता पार्टी राज्यातील दलित समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, त्यामुळे दलित समाजाने घाबरून जाऊ नये.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी येथील बंगल्यासमोर रेडणी गावच्या सौ.शोभा तानाजी चव्हाण (माजी सरपंच) व सौ.शहाबाई बन्सीलाल तरंगे (माजी सरपंच ) या दोन माजी सरपंचांच्या नेतृत्वाखाली कुटुंबातील अन्य महिलांसमवेत रविवारी (दि.१०) सकाळी उपोषण केले. आपल्या कुटुंबातील सदस्यांवर दरोड्याचे खोटे गुन्हे पोलिसांनी दाखल केल्याने झालेल्या अन्यायाची दखल ही महाआघाडी सरकारने घ्यावी, अशी रास्त मागणी उपोषणकर्त्या माजी सरपंचांची होती, असे भालेराव यांनी नमूद केले.
ते म्हणाले,रेडणी ग्रा.पं. माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य प्रफुल चव्हाण व दुसरे विद्यमान सदस्य सचिन तरंगे व इतरांवर खंडणीचे गुन्हे इंदापूर पोलिसांनी तक्रार दिल्यानंतर सुमारे दीड महिन्यांनी म्हणजे दि.८ जाने. ला दाखल केले आहेत.त्यामुळे न्याय मागण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या चव्हाण कुटुंबीयांनी नाईलाजाने मंत्र्यांच्या बंगल्यासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबिला. बंगल्यातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे या उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी आले असता, आमच्या पोरांना शिवी का दिली ? याचा जाब उपोषणकर्त्या महिलांनी राज्यमंत्र्यांना विचारला व महिलेने राज्यमंत्र्यांची कॉलर पकडत प्रश्नांचा भडिमार केला. राज्यमंत्री भरणे यांनी चव्हाण कुटुंबाची अवहेलना केल्याने महिलांच्या संतापाचा उद्रेक होणे सहाजिकच आहे. यात महिलांची काही चूक नाही.
प्रफुल्ल चव्हाण व त्यांचे सहकाऱ्यांवर चूक नसताना दरोड्यासारखे गंभीर असे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र इथे बोलता येत नाही अशा अश्लील भाषेत शिवीगाळ करून मंत्री भरणे यांनी दलित कुटूंबाची अवहेलन केली आहे,मी या शिवीगाळीचा जाहीर निषेध करीत आहे. मागासवर्गीय समाज हा महाआघाडी सरकारच्या कार्यकाळात असुरक्षित असून जनतेवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, हे या घटनेवरून दिसून येत आहे. प्रफुल्ल चव्हाण, सचिन तरंगे व इतरांवर दाखल करण्यात आलेले दरोड्याचे खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत व पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी केली.
यावेळी भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सचिन आरडे, पुणे जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे, रावसाहेब रागपसरे, अतुल सरतापे, भरत वैरागे, कोमलताई शिंदे या प्रदेश पदाधिकाऱ्यांसह संतोष कांबळे, शशिकांत भोसले, गणेश गायकवाड, अक्षय आरडे, तुकाराम मोहिते, रवी साळवे, विठ्ठल मिसाळ उपस्थित होते. या पत्रकार परिषदेपूर्वी सुधाकर भालेराव यांनी रेडणी येथे जाऊन चव्हाण कुटुंबीयांची भेट घेतली.

