विराट कोहली ( कप्तान ), रोहित शर्मा, के.एल राहुल, मयंक अग्रवाल, रिषभ पंत, रविंद्र जडेजा, रविचंद्रन आश्वीन, जसप्रित बुमराहा, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा व भुवनेश्वर कुमार हा कोणत्या दौऱ्यासाठी निवडलेला भारतीय संघ आहे ? असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर त्याचं उत्तर असं आहे की, हा भारताचा कोणत्याही दौऱ्यासाठी निवडलेला प्रमुख खेळाडूंचा संघ नसून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी किंवा तेथे गेल्यानंतर जखमी झालेल्या खेळाडूंची यादी आहे. यातील विराट कोहली हा एक मात्र खेळाडू आहे की, जो ज्या क्रिकेटच्या जोरावर जगप्रसिद्ध झाला, नावलौकिक, अमाप पैसा मिळविला त्याच्या राष्ट्रीय संघाला विदेश दौऱ्यात अर्धवट सोडून कौटुंबिक कारणासाठी मायदेशी परतला आहे.
सध्या भारताचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात भारतीय संघाला दौऱ्याच्या सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन खेळाडू, पंच व प्रसिध्दी माध्यमे यांच्या बरोबरच स्वतःच्या खेळाडूंच्या दुखापतीने जबरदस्त हैराण केले आहे.दौऱ्याच्या सुरुवातीपासूनच इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार व रोहीत शर्मा हे प्रमुख खेळाडू वेगवेगळ्या प्रकारच्या दुखापतीने त्रस्त असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला जाऊ शकले नाही. प्रत्यक्ष दौऱ्यात वनडे मालिका काही अंशी निर्विघ्न पार पडली. मात्र त्यानंतर सुरु झालेल्या टि-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात रविंद्र जडेजाच्या हेल्मेटवर जोरदार बाऊंसर लागल्यामुळे तो त्या सामन्यातूनच बाहेर पडला.
" कनकशन " नियमामुळे त्याच्या ऐवजी युजवेद्र चहलला संधी मिळाली व त्याने शानदार कामगिरी करून सामनावीर पुरस्कार मिळविला व भारताला विजय मिळवून दिला होता, हे आपणास ज्ञात असेलच. या व हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने जडेजाला पुढचे दोन टि-२० व पहिल्या डे नाईट कसोटीला मुकावे लागले होते.
ॲडलेडच्या डे नाईट कसोटीत कसोटीत दुसऱ्या डावात भारताचा डाव ३६ धावांत गुंडाळला गेला. त्या डावात मोहम्मद शमीच्या उजव्या मनगटाला फ्रॅक्चर झाले. त्यामुळे त्याला मायदेशी परतावे लागले.मेलबोर्नच्या दुसऱ्या कसोटीत तंदुरुस्त होऊन जडेजा संघात परतला तो सामना भारताने जिंकून मालिकेत बरोबरी केली. परंतु ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज उमेश यादव पायाच्या घोटयाला झालेल्या दुखापतीने त्या सामन्यातूनच नव्हे तर संपूर्ण दौऱ्यातून बाद झाला.
सिडनीच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी नेटमध्ये सराव करताना के.एल राहुल मनगटावर चेंडू आदळून फ्रॅक्चर झाल्याने मायदेशी रवाना झाला. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून बरा झालेला रोहित शर्मा संघाला येऊन मिळाला व प्रत्यक्ष सामन्यात खेळलाही. सिडनीच्या त्या वादग्रस्त सामन्यात ऑस्ट्रेलियन पंच, प्रेक्षक व खेळाडूंच्या गैरव्यवहारा व्यतिरीक्त भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या शरीरवेधी म्हणजेच जिवघेण्या गोलंदाजीने हैराण केले. भारताच्या पहिल्या डावात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला डाव्या हाताच्या कोपरावर चेंडू लागल्याने दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात त्याच्या ऐवजी वृद्धीमान साहाने यष्टीरक्षण केले होते.
रिषभ पंत जखमी झाला त्याच डावात रविंद्र जडेजा फलंदाजी करत असताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला जोरदार चेंडू लागल्याने तो फ्रॅक्चर झाला. त्यानंतर संपूर्ण कसोटी व दौऱ्यातून तो बाहेर पडला.
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या ४०७ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांना चिडलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या चेंडूचा मार सहन करावा लागला. त्यामध्ये रविचंद्रन आश्वीन व हनुमान विहारीला अनेक चेंडूचा प्रसाद मिळाला. याच डावात हनुमान विहारी जांघेतील हॅमस्ट्रिंग दुखावल्याने पुढच्या सामन्याबरोबर आगामी इंग्लंड बरोबरील मालिकेलाही मुकणार आहे.
रविचंद्रन आश्वीन भारतीय गोलंदाजीचा भार पडल्याने कमरेच्या दुखापतीने त्रस्त आहे. तर संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहा सुध्दा पोटाचे स्नायू दुखावल्याने चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सिडनी कसोटी न खेळलेला मयंक अग्रवालही मनगटाच्या दुखापतीने त्रस्त आहे.प्रमुख खेळाडूंच्या या प्रकारे दुखापतग्रस्त होण्याने संघाच्या संतुलनावर फार मोठा ताण पडत आहे. इतकेच नाही तर संघासमोर चौथ्या कसोटी साठी ११ तंदुरूस्त खेळाडूंचा संघ निवडण्याचा प्रश्न पडला आहे.
आतापर्यंत तरी अनफिट व नवोदित खेळाडूंचा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या सर्वगुण संपन्न व ताकदवान संघाला त्यांच्याच मायभूमित भारी पडत असून मालिका जिंकण्याची जास्त शक्यता आहे.भारतीय संघाचे फिजीओ डॉ. नितिन पटेल एवढया सगळ्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे सर्वात जास्त बिझी आहेत तर भारताच्या ड्रेसिंग रूमला रूग्णालयाचं स्वरूप प्राप्त झालं आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

