भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून भारतीय संघाने या दौऱ्यात आतापर्यंत खेळलेल्या वनडे, टि-२० व दोन कसोटयात यजमान ऑस्ट्रेलियाला जशास तसे उत्तर दिले आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे आठ पैकी ४ सामने भारताने तर चार सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. त्यापैकी वनडेची मालिका कांगारूंनी २-१ तर टि -२० ची मालिका भारताने तितक्याच फरकाने खिशात घातली. तर अॅडलेड येथे झालेल्या डे नाईट कसोटीत कांगारूंनी भारताचा दुसऱ्या डावात केवळ ३६ धावात फडशा पाडत आठ गडी राखून आरामात विजय मिळविला.
या दौऱ्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे भारत आपल्या अनेक प्रमुख खेळाडूंशिवाय प्रत्येक सामन्यात खेळला. शिवाय पहिल्या कसोटीत झालेल्या दारूण पराभवानंतर संघाचा नियमीत कर्णधार व अति भरवशाचा फलंदाज विराट कोहली "बाप बनण्याच्या विशेष सुट्टीवर " मायदेशी परतला. तर मोहम्मद शमी पहिल्या कसोटीत जखमी झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला. त्यामुळे संघात वरकरणी फार मोठी पोकळी दिसत होती.
या सर्व घडामोडीत अनेक तथाकथित ज्ञात अज्ञात क्रिकेट पंडितांनी ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका ४-० अशी जिंकणार असे भाकित देखिल वर्तवून मोकळे झाले. सर्वांना वाटले होते की भारतीय संघ पहिल्या कसोटीतील पराभवाने बावचळून जाईल व पुढील सर्व कसोटयात सपशेल लोटांगण घेईल. परंतु झाले उलटेच कर्णधार विराट कोहलीचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या थंड डोक्याच्या अजिंक्य राहणेने संघाची मोट आगळ्यावेगळ्या पद्धतीने बांधली.
संघात मोठे बदल करताना त्याने शुभमन गिल व मोहम्मद सिराज यांना पदार्पणाची संधी दिली तर रिषभ पंत व रविंद्र जडेजाने पुनरागमन केले. भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत साफ लोटांगण घेईल अशा भ्रमात असलेल्या ऑस्ट्रेलियालाच उलट भारताने कोपऱ्यात घेऊन जोरदार मार दिला. प्रथम कर्णधार राहणेने उपलब्ध गोलंदाजांचा शिताफीने उपयोग केला तर क्षेत्ररक्षकांच्या उत्तम कामगिरीने कांगारूं दोनशेच्या आत डब्यात गेले. त्यानंतर फलंदाजांनी राखेतून जिवंत होत जोरदार मुसंडी मारत भली थोरली आघाडी घेत कांगारूंच्या मुस्काटात जोरदार थप्पड मारली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाज वरचढ ठरल्याने कांगारूंचा संघ पुन्हा एकदा दोनशेच्या आत गुंडाळला गेला. कांगारूंनी दिलेले सत्तर धावांचे किरकोळ लक्ष पार करत भारताने सामना जिंकला व मालिका बरोबरीत आणली.
या पराभवाच्या झटक्याने एकाएकी जमीनीवर धाडकन आदळलेल्या कांगारूंनी भारत मालिकेत भारी पडणार याचा अंदाज लागताच त्यांच्या खास ऑस्ट्रेलियन शैलीत भारतीय संघाला टारगेट करून अडचणीत आणण्याची कुटनिती सुरू केली.मेलबोर्न मधील कोरोना नियमांचे पालन करत भारतीय संघात दाखल होऊन कसोटीचे उपकर्णधारपद मिळविणारा जिगरबाज फलंदाज रोहीत शर्मा, रिषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदिप सैनी, शुभमन गिल एक जानेवारी रोजी दुपारचे जेवण घेण्यासाठी बाहेर गेले. तिथे त्यांनी नियमाप्रमाणे हॉटेलच्या बाहेर जेवण करण्यास सुरुवात केली परंतु त्याच वेळेस पाऊस आल्याने ते जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले. त्याच वेळेस एका अतिउत्साही फॅनने त्यांचा व्हिडीओ काढून समाज माध्यमात व्हायरल केला व सदर फॅनने उपरोक्त खेळाडूंच्या जेवणाचे बिलही अदा केले व त्याची पावतीही समाज माध्यमांवर टाकली. या घटनेचा फार मोठा गवगवा करून तेथील प्रसिद्धी माध्यमांनी भारतीय खेळाडूंना खलनायक बनविण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय संघ व्यवस्थापन व बीसीसीआयने परिस्थितीची शहानिशा करत संबंधीत खेळाडूंची पाठराखण केली.
ह्यामुळे भारतीय संघाचं मनोधैर्य बिघडत नाही हे बघून ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी टि-२० मालिकेनंतर कर्णधार कोहली व हार्दीक पांडयाचा एका " बेबी व्हिलेज " मॉल मध्ये मास्क न लावलेला फोटो दोन दिवसांपूर्वी व्हायरल केला. प्रसारमाध्यमांच्या म्हणण्यानुसार कोहली व पांडयाने कोरोना संबंधातील नियमांचे उल्लंघन केले होते. दोन कसोट्या झाल्यानंतर कागारूंचं हे प्रकरण बाहेर काढण्याचं कारण काय ? पहिल्या कसोटीतील ते ९० मिनिटे वगळता त्या सामन्यातही भारत भक्कम स्थितीत होता. आता तर संघ विजयी पथावर आला आहे. शिवाय धडाकेबाज रोहीत शर्मा संघात परतल्याने भारताची परिस्थिती वरचढ ठरत असल्याचे बघून ऑस्ट्रेलियन थिंक टँकने भारतीय खेळाडूंना व संघाला मानसिकदृष्टया खच्ची करण्याचे काम सुरू केले.
भारतीय खेळाडूंचे वारेमाप कौतुक करून त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचे प्रयोगही तेथील जुन्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी राबविले. तेही निष्फळ ठरल्याने ऑस्ट्रेलियन सरकारमधील मंत्रीही भारतीय संघाच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. कोरोना संक्रमणामुळे आयसीसीने तटस्थ पंचांना काम देण्याचे बंद केल्याने स्थानिक पंचाचे देशप्रेमही मोठया प्रमाणावर उफाळून येत आहे. वादग्रस्त " अंपायर्स कॉल " मध्ये मैदानातील पंच ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्याच बाजूने निर्णय देतात, पुढे त्या निर्णयावर तिसरा पंचही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दिलासा देणारे निर्णय देत आहेत. तरीही भारतीय खेळाडू कशालाच भिक घालत नसल्याचे बघून भारतीय संघास मानसिक त्रास देण्याचे धोरण ऑस्ट्रेलियन खेळाडू, क्रिकेट बोर्ड, पंच, सरकारमधील मंत्र्यांनी सुरू केले आहे.
" अतिथी देव भव " ही पाहुण्यांचा सन्मान करण्याची भावना ऑस्ट्रेलियन लोकांना कदाचित माहीती नसावी. केवळ जिंकणं हेच त्यांचे ध्येय असल्याने ते कोणत्याही स्तराला जावू शकतात. चार कसोटींच्या मालिकेतील उर्वरीत दोन सामन्यात भारतीय संघ वरचढ ठरणार असल्याने प्रत्यक्ष सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू अखिलाडूपणाचा कळस गाठणार हे उघड असल्याने भारतीय खेळाडूंनी ही " जशास तसे " धोरण अवलंबून आपले चित्त सांभाळून कांगारूंना ३ -१ असा स्वप्नवत मार द्यावा.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

