shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारत पराभव टाळण्यात यशस्वी ठरेल ? ऑस्ट्रेलिया भारताला हरविण्यात यशस्वी होईल ?

गोलंदाज कमावतात आणि फलंदाज गमावतात हि भारतीय क्रिकेटची पूर्वीपासून चालत आलेली परंपरा सिडनीच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी कायम राखली आहे. ॲडलेड कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारताने मेलबोर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा डोस पाजून मालिकेत बरोबरी साधल्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ विजयासाठी हॉट फेवरीट म्हणून गणला गेला. परंतु या दरम्यान मायदेशात प्रचंड रोषाचे धनी बनलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपल्या खेळात अमूलाग्र बदल केला. झाल्या चुकांवर बारकाईने अभ्यास करून त्या दुरुस्त केल्या. मागील दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या स्टीव्हन स्मिथ व मार्नस लाबुशने यांनी आपली जबाबदारी ओळखून खेळ केला तर तंदुरुस्त नसतानाही डेव्हीड वॉर्नर संघासाठी मैदानात उतरला. भले तो समाधानकारक खेळ करू शकला नाही, पण त्याने देशभक्ती खऱ्या अर्थाने निभावली.

दुसऱ्या दिवसअखेर सामन्याचे पारडे दोन्ही संघासाठी समतोल होते. तिसऱ्या दिवसाचा खेळ सामन्याचा कल ठरविणार होता. जो संघ परिस्थितीला अनुसरून खेळ करेल त्याच्या बाजूने सामना झुकणार होता. भारताला कर्णधार अजिंक्य राहाणे व चेतेश्वर पुजाराकडून मोठया अपेक्षा होत्या. परंतु त्यांना पडलेले चेंडू खेळण्यास अनप्लेएबल होते. दोघेही जम बसल्यानंतर परतले. तर हनुमान विहारी, रवीचंद्रन आश्विन व जसप्रित बुमराहा धाव घेताना  हाराकिरीचे बळी ठरले व धावबाद झाले. आश्विन व बुमराहा जडेजाच्या चुकीमुळे धावचित झाले. 

रिषभ पंत चुकीच्या तंत्राने फलंदाजी करत होता. त्याचे प्रायचित्त डावा हात जखमी होऊन त्याला मिळाले तर रविंद्र जडेजाही स्टार्कचा चेंडू अंगठ्याला लागून जखमी झाला. या मालिकेत रिषभ पंत, रविंद्र जडेजा, उमेश यादव, के.एल.राहुल व मोहम्मद शमी जखमी झाले आहेत. यामुळे भारताला फार मोठा झटका बसला असून नियमीत कर्णधार कोहली कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतल्याने संघाच्या संकटात वाढच झाली.

ऑस्ट्रेलियन संघाने प्रत्येक भारतीय खेळाडूंच्या गुण अवगुणांचा बारकाईने अभ्यास केल्याने गोलंदाजी व फलंदाजीत भारताची कामगिरी खालावली. त्या उलट कांगारूंनी फलंदाजीत अपेक्षेपेक्षा सुरेख कामगिरी केली. त्यांच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना डोईजड होऊ दिले नाही. तर इतके दिवस टिकेचे लक्ष बनलेले क्षेत्ररक्षण एकाएकी सुधारल्याने भारतीयांची मोठी पंचाईत झाली.

सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर कांगारूंनी कसोटीवर घट्ट पकड मिळविली असून चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज ऑसीजचा डाव झटपट गुंडाळून विजयासाठी मिळालेल्या लक्षाचा कशा प्रकारे पाठलाग करतात यावरच भारताचे भवितव्य अवलंबून आहे. भारताने जर चिवट व झुंजार फलंदाजी केली तर ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतवण्याची ताकद भारतीय संघात नक्कीच आहे. त्यासाठी सकारात्मक व्युुव्हरचना आखून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

शेवटी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असून सामन्याचा शेवटचा चेंडू पडेपर्यंत निकाल लागत नसतो. हे देखील आपल्याला विचारात घ्यावे लागेल.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close