अहमदनगर (शफीक बागवान) - येथील उपप्रादेशिक परिवहन(आरटीओ) अधिका-यांकडून ठिकठिकाणी आयोजित केल्या जात असलेल्या आरटीओ कॅम्पसमधून सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात सर्रास लूट केली जात असून याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात संताप आणि चीड व्यक्त केली जात आहे.
या कार्यालयनांतर्गत ठिकठिकाणच्या तालुक्यात आरटीओंशी निगडित, वाहनांच्या निरनिराळ्या परवाना कामांसाठी दर महा कॅम्प आयोजित केले जातात. तेथे परवाना कसा व कोणाला दिला जातो हे जगजाहीर आहे.
याशिवाय शिकाऊ उमेदवारांना दिले जाणारे प्रशिक्षण अतिशय निकृष्ठ दर्जाचे दिले जाते. मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकच या ठिकाणी थांबून नेमणुकीस असलेल्या आरटीओ चमुंना परवाना देण्यासाठी मार्गदर्शन करतात, मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांच्या सल्ल्यानेच प्रत्येकास परवाना दिला जातो हे विशेष. यात विशेष बाब म्हणजे आरटीओ हेच यासाठी आग्रही आणि मुख्य सुत्रधार असल्याची बाब पुढे आली आहे,
' वाहन चालविताना कायद्याचे पालन करा, सुरक्षितता पाळा ' असा संदेश इतर नागरिकांना देण्यासाठी नेमलेल्या या आरटीओ अधिकार्यांकडून कायद्याचे पालन न करणार्यांना वेगवेगळ्या स्वरुपात दंड ठोठावला जातो,परंतु हा आरटीओ अधिकाऱ्यांचा चमूच शासनाची घोर फसवणूक करत असेल तर त्यास जबाबदार तरी कोण ?, असा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जात आहे...
आरटीओ कॅम्पमध्ये एजंटांच्या माध्यमातून मलिदा गोळा करणार्या या काही खादाड अधिकार्यांच्या चमुंविरोधात लढा उभा करण्याचा इशारा येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे, शासनाकडून गलेलट्ठ असा पगार मिळत असताना देखील हे काही खादाड अधिकारी एजंटांच्या माध्यमातून मलाई गोळा करतात, शासनाला अशा प्रकारे अंधारात ठेऊन आपली तुंबडी भरणा-या या अधिकार्यांच्या अपसंपदेची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
येथील आरटीओ कार्यालयाकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचना तसेच काही मागण्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. या अधिकार्यांच्या अशा या गैरकारभारावर अंकुश लावणे गरजेचे ठरत असून काही अधिकारीच नियमांचा भंग करून असे वागत असतील तर सर्वसामान्यांकडून चांगली अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे...
दरम्यान, याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात येणार असून आरटीओच्या अशा खादाड भुमिकेत काहीच सुधारणा न झाल्यास इतर लोकशाही मार्गाचा अवलंब करण्याचा इशारा काही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
"तक्रारीचे पुरावे आणि आरटीओ....
येथील आरटीओ कार्यालय अधिकार्यांसाठी चराऊ कुरण बनले असल्याचे वृत्त यापूर्वी प्रसिद्ध होताच या कार्यालयात इतर अधिकार्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली, वाहने आडवून आरटीओ अधिकारी पैसे कसे उकळतात,आणि शासनाची कशी फसवणूक केली जाते, सगळा मलिदा हे अधिकारी कसा स्वतःच्या घशात घालतात, याबाबत इत्यंभूत माहिती आणि तसे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे पुरावे संबंधित अधिकार्यांनी मागितले असून ती देण्याची तयारी आता सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे.

