आमच्या घराच्या भिंतीला लागून एक कुत्री व्यायली. सहा सहा पिल्लं. कुत्री भटकी. आता तिला खायला प्यायला कोण देणार? दिवसभर ती अन्नासाठी भटकत राहायची. तिची वाट पाहणारी पिल्लं भुकेनं आणि आईच्या विरहानं व्याकुळ व्हायची. रडवेल्या आवाजात दिवसभर ओरडत राहायची. पावसात तर त्यांचं केविलवाणं विव्हळण खूपच त्रासदायक व्हायचं.
अप्पूनं मग त्या पिल्लांना घरासमोर आणून ठेवलं. भिंतीलगत एक बॉक्स ठेवून त्यात पिल्लांना बसायला कापड अंथरलं. पिल्लांना तो सकाळ संध्याकाळ दूध देऊ लागला. ती पिल्लं चपाती खायला लागली तेव्हा त्यांना तो दूधचपाती कुस्करून घालू लागला. कुत्रीनं पिल्लांना सोडून जाऊ नये म्हणून त्यानं तिलाही सकाळ संध्याकाळ ताजं ताजं जेवण देणं सुरू झालं.
एक दिवस अप्पू पिल्लांना जेवायला घालतोय तोपर्यंत कुत्री आमच्या व्हरांड्यात शिरली आणि तिनं माझी नवी कोरी चप्पल पळवली. अप्पूच्या लक्षात आल्यावर दगड मारून त्यानं ती चप्पल परत मिळवली पण तोपर्यंत कुत्रीनं एक दात चप्पलच्या पट्ट्यात घुसवला होता. गेल्या आठवड्यात घेतलेली पावणेतीन हजाराची चप्पल फाटली म्हणून आम्हांला खूप वाईट वाटलं. म्हटलं, डॅमेज कुणाच्या लक्षात येण्यासारखं नाहीय, तेव्हा चप्पल आहे तशीच वापरायला काही हरकत नाही. त्या दिवसापासून आम्ही कुत्रीनं आत येऊ नये म्हणून गेट मात्र नेहमी बंद ठेवू लागलो.
चार दिवस गेले आणि माझी चप्पल पुन्हा गायब झाली. मला कळेना. म्हटलं गेट तर नेहमी बंद असतं, मग चप्पल गेलीच कुठं? इकडंतिकडं पाहिल्यावर लक्षात आलं की, त्या पिल्लांपैकीच एक पिल्लू गेटच्या फटीतून आत येऊन माझी चप्पल कुरतडत बसलेलं.
आईनं नुसता दात घुसवला होता तर पिल्लानं पूर्ण चप्पलच निकामी केली. घरच्या सगळ्यांनाच वाईट वाटलं. केलेल्या उपकारांची परतफेड त्या मायलेकरांनी अशी करायला नको होती यावर सगळ्यांचंच एकमत झालं.
एवढं झालं तरी आमच्यापैकी कुणीही त्या कुत्रीला किंवा पिल्लांना हाकलून लावायचा विचार केला नाही. घरच्या सगळ्यांचं असं मत होतं की, या स्थितीत त्यांना हाकललं तर पिल्लं मरू शकतात. तेव्हा कुत्री किंवा पिल्लं इथून जाईपर्यंत आपणच आपल्या वस्तू जपून ठेवाव्यात.
आपल्याशी कुणी कसंही वागलं किंवा आपलं नुकसान केलं तरी आपण मात्र इतरांशी चांगलंच वागलं पाहिजे. कारण आपण 'माणसं' आहोत!
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

