शंभर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे होणार लसीकरण..!
शिर्डी ॥ प्रतिनिधी (कु किरण जाधव):
केंद्र, राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राहाता ग्रामीण रुग्णालय येथे आज कोरोना प्रतिबंध लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली. ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रातील जवळपास शंभर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना या मोहिमेत कोरोना प्रतिबंध लस देण्यात येणार आहे.
गेल्या काही काळात शासनासह कोरोना योध्दे, पोलीस कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, नागरिक कोरोना प्रादूर्भावावर मात करण्यासाठी कार्यरत होते. या पार्श्वभूीवर कोरोना लसीकरण होत असल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून येत होते. लसीकरणानंतर संबधितांचे योग्य ते निरिक्षण आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोकूळ घोगरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, साई संस्थान रुग्णालयाचे डॉ.विजय नरवडे, आरोग्य विभागाचे कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
लसीकरण मोहिमेची सर्व तयारी आरोग्य प्रशासनाने पूर्ण केली असल्याची व त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोकूळ घोगरे यांनी यावेळी दिली. संबंधित लसटोचक आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
काही लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते यावेळी लसीकरण करण्यात आले. लसीकरण मोहिमेतील या पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या दिशानिर्देशांचे लसीकरणादरम्यान पालन करण्यात आले.
लसीकरण झाल्यावरही मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सींगचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी, पुणे येथून कोरोना लसीचे डोस योग्य त्या प्रोटोकॉलनुसार अहमदनगर येथे आणण्यात आले.
तेथून जिल्हा परिषद येथे त्याची साठवणूक करण्यात येऊन त्यानंतर या लसीचे वितरण संबंधित लसीकरण केंद्रांना करण्यात आले. जिल्ह्यात एकूण 12 केंद्रांवर पहिल्या टप्प्यात ही मोहिम राबविण्यात येणार असून यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि महानगरपालिका क्षेत्रातील चार नागरी आरोग्य केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. या लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून दिनांक आठ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात कोरोना लसीकरणासाठी सरावफेरी घेण्यात आली.

