shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात..!!

  • अंगणवाडी सेविका आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेतला पहिला डोस.
  • विविध १२ केंद्रांवर लसीकरणास सुरुवात.


अहमदनगर: कोरोना लसीकरण मोहिमेस आज जिल्ह्यात विविध १२ केंद्रांवर सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जिल्ह्यातील या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महानगरपालिकेच्या जिजामाता नागरी आरोग्य केंद्र येथे केला. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी लसीचा पहिला डोस घेतला तर जिजामाता नागरी आरोग्य केंद्र येथे ज्योती लवांडे या अंगणवाडी सेविकेस पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या लसीकरण मोहिमेचे स्वागत केले. 'कोरोनाला हरवायचं आहे' या आत्मविश्वासाने कार्यरत असणार्‍या या फ्रन्टलाईन वर्करना या लसीचा बुस्टर डोस मिळाल्याने त्यांचेही मनोबल उंचावले. लसीकरणानंतर कोणत्याही आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांना त्रास जाणवला नाही. मोहिमेच्या सुरुवातीनंतर जिल्ह्यात इतर केंद्रांवर लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. मुख्य कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने बजावलेली भूमिका महत्वपूर्ण असून पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून त्यांना लस देण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्ह्यात एकूण २१ केंद्र असून पैकी जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, शेवगाव ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय, राहाता ग्रामीण रुग्णालय, संगमनेर ग्रामीण रुग्णालय, अकोले ग्रामीण रुग्णालय तसेच महानगरपालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र आणि नागापूर नागरी आरोग्य केंद्र अशा १२ केंद्रांवर ही मोहिम सुरु झाली.



अहमदनगर महापालिकेच्या जिजामाता नागरी आरो्ग्य केंद्र येथे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह आमदार संग्राम जगताप, स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, महानगरपालिकेचे पदाधिकारी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ज्या आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात येणार होते, त्यांची ओळख पटवून पोर्टलवरील त्यांच्या नावाची खात्री झाल्यानंतर त्यांना लसीकरण करण्यात येत होते. अंगणवाडी सेविका ज्योती लवांडे यांना लसीकरणाचा पहिला मान मिळाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि आमदार जगताप यांनी पुष्पगु्च्छ देऊन ज्योतीताईंचे कौतुक केले. लसीकरणानंतर काही त्रास होत नाही ना, अशी विचारणाही केली. त्यावर त्यांनी त्रास होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर एका एका क्रमाने आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणास सुरुवात झाली.






जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. लशीचा पहिला डोस स्वत: जिल्हा शल्य चिकित्सक ड़ॉ. पोखरणा यांनीच घेतला. त्यानंतर लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी लसीकरणासंदर्भातील नियोजनाची माहिती घेतली.


 कोरोना लसीकरण मोहिमेसाठी सर्व केंद्रांनी प्राथमिक तयारी यापूर्वीच पूर्ण केली होती. आरोग्य विषयक जनजागृती करणारी रांगोळी आरोग्य केंद्राच्या बाहेर रेखाटण्यात आली होती. लसीकरण देण्यात येणार्‍या आरो्ग्य कर्मचार्‍यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथून त्यांना ओळख पटवून तसेच त्यांच्या शरीराचे तापमान मोजल्यानंतर लसीकरणाला नेले जात होते. लस दिल्यानंतर अर्धा तास त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जात होता. सुरुवातीच्या टप्प्यात पहिल्या २ तासांत साधारण प्रत्येक केंद्रांवर १२-१४ जणांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत जिल्ह्यातील १२ केंद्रांवर ३९० जणांचे लसीकरण  झाले होते तर सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण १२ केंद्रांवर ६४४ जणांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय २६, उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी-५८,  उपजिल्हा रुग्णालय कर्जत -२४, शेवगाव ग्रामीण रुग्णालय - ७६, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय- ९१, राहाता ग्रामीण रुग्णालय -३४, संगमनेर ग्रामीण रुग्णालय -७०, अकोले ग्रामीण रुग्णालय- ७४, तोफखाना नागरी आरोग्य केंद्र -४६, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र- ४६, केडगाव नागरी आरोग्य केंद्र -६० आणि नागापूर नागरी आरोग्य केंद्र येथे ३९ जणांना लसीकरण करण्यात आले होते.


उपजिल्हा रुग्णालय, कर्जत येथे लसीकरण: कोरोना लसीकरण मोहिमेस येथे सुरुवात झाली. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक सुचिता यादव  यांच्या मार्गदर्शनाखाली तेथे नियोजन करण्यात आले होते. लसीचा पहिला डोस आरोग्य कर्मचारी अजितकुमार भारती यांना देण्यात आला. लसीकरण सहनियंत्रक डॉ. गायकवाड, डॉ. अक्षदा जेवरे, डॉ. सौ. शेख यांच्यासह आरोग्य कर्मचारी जयश्री हिंगे, जाधव, बोरडे, साबळे, शिंदे आदींची उपस्थिती होती. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार लसीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात आली.


 उपजिल्हा रुग्णालय, पाथर्डी: येथे उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. तहसीलदार शाम वाडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कराळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जरांडे, डॉ. नवनाथ आव्हाड, डॉ. विनोद गर्जे आदींची उपस्थिती होती. यावेळी स्वप्नील गर्जे यांना पहिली लस देऊन लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.


 ग्रामीण रुग्णालय शेवगाव: या केंद्रावर सकाळी लसीकरणास सुरुवात झाली.उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, प्र. गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार, शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रामेश्वर काटे, डॉ. दीपक परदेशी, शेवगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष किसन माने, शेवगाव तालुका डॉक्टर्स असोसिएशन अध्यक्ष डॉ. विलास बेडके, आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर यांच्यासह डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


  ग्रामीण रुग्णालय श्रीरामपूर: श्रीरामपूर ग्रामीण रुग्‍णालय येथे आज कोरोना प्रतिबंध लसीकरणाला उत्साहात सुरुवात झाली. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी लस देण्यात आली. गेल्या काही काळात शासनासह कोरोना योध्दे, पोलीस कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, नागरिक कोरोना प्रादूर्भावावर मात करण्यासाठी कार्यरत होते. या पार्श्वभूीवर कोरोना लसीकरण होत असल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून येत होता. लसीकरणानंतर संबधितांचे योग्य ते निरीक्षण आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्क डॉ.वसंत जमधडे, डॉ.विनोद बंड, डॉ.कौस्तुभ शेवंते, डॉ.प्रशांत चव्हाण लसीकरणामध्ये सहभागी झाले होते. आरोग्य विभागाचे कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. लसीकरणापूर्वी  संबंधित लसटोचक आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आले.


 ग्रामीण रुग्णालय राहाता: साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोकुळ घोगरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, साई संस्थान रुग्णालयाचे डॉ.विजय नरवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. आरोग्य विभागाचे कर्मचारी  याप्रसंगी उपस्थित होते. कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या दिशानिर्देशांचे लसीकरणादरम्यान पालन करण्यात आले. लसीकरण झाल्यावरही मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सींगचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालय संगमनेर: संगमनेर येथील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या हस्ते झाला. तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी श्री. शिंदे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, डॉ. घोलप, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके आदींच्या उपस्थितीत झाला. डॉ. छाया लोहारे यांना लशीचा पहिला डोस देण्यात आला.  

ग्रामीण रुग्णालय, अकोले: येथील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. पहिली लस डॉ. शाम शेटे यांना देण्यात आली. गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, वैद्यकीय अधिकारी वर्ग-१ डॉ. संजय गोगरे, तालुका आरोग्य अधिकारी इंद्रजीत गंभीरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहेत्रे, डॉ. लोंढे, डॉ. सोनवणे आदींची यावेळी उपस्थिती होती.

मनपाचे तोफखाना नागरी आरोग्य केंद्र - याठिकाणी लसीकरण मोहिमेचे समन्वयन वैद्यकीय अधिकारी डॉ. नलिनी थोरात, डॉ, सुजीत सैंदाणे, गणेश मोहोळकर यांच्यासह इतर आरोग्य कर्मचार्‍यांनी  केले. याठिकाणी पहिली लस डॉ. अशोक गायकवाड यांना देण्यात आली.

मनपाचे जिजामाता नागरी आरोग्य केंद्र- जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभच या केंद्रातून झाला. अंगणवाडी सेविका ज्योती लवांडे यांना पहिली लस देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले, आमदार संग्राम जगताप यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. याचबरोबर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आयेशा शेख, डॉ. आरती डापसे यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

मनपाचे केडगाव नागरी आरोग्य केंद्र-  वैद्यकीय अधिकारी डॉ. टी.जी. गोरे यांच्या नियोजनात लसीकरण मोहिम राबवण्यात आली. यावेळी लसीची पहिली मात्रा सुरेखा संजय परवत यांना देण्यात आली.

मनपाचे नागापूर नागरी आरोग्य केंद्र: याठिकाणी वैद्यकीय अधिकारी गिरीश दळवी यांनीच लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.


****

close