प्रतिनिधी। मोहन शेगर :
सोनई । वार्ताहर - अध्यासी अधिकारी तथा नगर विभागाचे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली आज पदाधिका-यांची निवड करण्यासाठी मुळा सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात नानासाहेब तुवर यांची अध्यक्ष पदावर तर कडूपाटील कर्डिले यांची उपाध्यक्ष पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली.
मुळा कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक दिनांक १९ जानेवारी २०२१ रोजी बिनविरोध जाहीर करण्यात आली होती. आज शुक्रवारी पदाधिका-यांची निवड करण्यासाठी प्रांताधिका-यांनी संचालक मंडळाची बैठक बोलावली होती. अध्यक्षपदासाठी संचालक निलेश विठ्ठलराव पाटील यांनी नानासाहेब तुवर यांचे नाव सुचविले व त्यास संचालक बाळासाहेब आसाराम गोरे यांनी अनुमोदन दिले.
तर उपाध्यक्षपदासाठी संचालक श्री.बापूसाहेब शंकर शेटे यांनी कडूपाटील कर्डिले यांचे नाव सुचविले व संचालिका ताराबाई सुखदेव पंडित यांनी अनुमोदन दिले. सभेचे अध्यक्ष प्रांताधिकारी यांनी या दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर केल्या व नवनिर्वाचित संचालक तसेच बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. कारखान्याचे संचालक जलसंधारण खात्याचे मंत्री नामदार शंकरराव गडाख हे मंत्रालयीन कामासाठी मुंबईत असल्याने ते या मिटींगला उपस्थित राहू शकले नाहीत.
संचालक मंडळाची बैठक संपल्यानंतर नवीन पदाधिकारी व संचालकांनी मुळा कारखान्याचे संस्थापक माजी खासदार यशवंतरावजी गडाख यांची भेट घेऊन आर्शिर्वाद घेतले. याप्रसंगी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला.

