सावळीविहीर (प्रतिनिधी) :
शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनाला दिवाळी पाडवा नंतर सुरुवात झाली असून दिवसेंदिवस येथे साईभक्तांचे दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. श्री साईबाबा संस्थान, शासनाच्या कोरोना संदर्भातील अटी व शर्ती राखत 15000 साईभक्तांची दररोज दर्शनाची व्यवस्था करत आहे. मात्र येथे गुरुवार ,शनिवार ,रविवार व सण, सुट्ट्यांच्या दिवशी येथे भक्तांची मोठी गर्दी होत असल्याने दर गुरुवार ,शनिवार, रविवार ,व सण, सुट्ट्यांच्या दिवशी शिर्डीतील दर्शन पासेस वितरण केंद्रे बंद ठेवण्यात येणार असून साईभक्तांनी या दिवशी ऑनलाईन दर्शनपास घेऊनच व तसे नियोजन करूनच शिर्डीत यावे .असे आवाहन श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
या पत्रकात बगाटे यांनी पुढे म्हटले आहे की, राज्य शासनाच्या परवानगीने दिवाळी पाडवा नंतर श्री साईबाबांचे मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे .मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व नवीन कोरोणाचा प्रकार आला असल्यामुळे शिर्डीत साई संस्थान मार्फत अटी व शर्ती ठेवत साई भक्तांना 15000 साई भक्तांच्या दर्शनाची व्यवस्था संस्थान करत असले तरी मात्र येथे दिवसेंदिवस साईभक्तांची गर्दी अनेकदा वृत्तपत्र, सोशल मीडिया व विविध प्रसिद्धी माध्यमाद्वारे संस्थांननी आवाहन करूनही गर्दी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. साई पालख्या शिर्डीत मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. त्यामुळे साईभक्तांची शिर्डीत गर्दी होत आहे .त्यामुळे शिर्डीत साई भक्तांनी येताना ऑनलाइन सशुल्क व निशुल्क दर्शन पास,आरतीपास घेऊनच शिर्डीत यावे. साई पालख्यांनी 100% शिर्डीत पालख्या घेऊन येण्याचे टाळावे.
गुरुवार ,शनिवार, रविवार व सण, सुट्ट्यांच्या दिवशी शिर्डीत साई भक्तांची होणारी गर्दी पाहता या दिवशी श्री साईबाबा संस्थानने सुरू केलेले शिर्डीतील दर्शन पास वितरण केंद्र यापुढे बंद ठेवण्यात येणार आहेत. तरी साई भक्तांनी या दिवशी ऑनलाईन दर्शन पास घेऊनच शिर्डीत यावे .असे आवाहन श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी केले आहे.

