*आश्रमशाळेचे प्रलंबित व चालू वर्षीचे परिपोषण आहाराचे अनुदान त्वरित द्या*:- *रत्नाकर मखरे यांची मागणी*.
*इंदापूर* :- *प्रतिनिधी* ( दि.१९ जाने.२१) येथील नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी आश्रमशाळांचे प्रलंबित व चालू परिपोषण आहाराचे अनुदान त्वरित मिळावे तसेच आश्रमशाळांकडे अपुरा असणारा शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वर्ग पूर्ण क्षमतेने भरावा व त्याच्या पूर्ततेसाठी प्रशासनास परवानगी द्यावी ह्या व अशा विविध मागण्यांसाठी (दि.१८) लेखी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांच्यासह सबंधीतांकडे मागणी केली आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सुरू असलेल्या व स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येत असलेल्या शासन मान्यता प्राप्त अनुदानित भटक्या जाती-जमातीच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चालवल्या जातात. त्याच धर्तीवर माझ्या मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह हे शासनाच्या धेय्य धोरणानुसार सुरू आहे,असे संस्थाप्रमुख रत्नाकर मखरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. रत्नाकर मखरे पुढे म्हणाले की, शासन,प्रशासनाकडून माझ्या आश्रमशाळांना नेहमीच सापत्नवाची वागणूक मिळत असून,मला संस्थेचा अध्यक्ष ह्या नात्याने नेहमीच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न प्रशासनातील अधिकारी शर्तीने करत असतात.मी शिव,फुले,शाहू आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक असून त्यांना अभिप्रेत असलेल्या विजाभज इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा. त्यांना दर्जेदार व उत्तम शिक्षण मिळावे तसेच त्यांच्या राहण्याची,जेवणाची सोय व्हावी, ह्याचं उदात्त हेतूने प्रेरित होऊन मी गेले २९-३० वर्षापासून मी माझी संस्था उत्कृष्ठपणे चालवीत आहे. परंतु प्रशासनातील अधिकारी विशेषतः सामाजिक न्याय विभागाचे, इतर मागास बहुजन कल्याण विभागातील अधिकारी जाणून बुजून मला व माझ्या आश्रमशाळांना त्रास देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.आश्रमशाळा संबंधी विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी वेळोवेळी पाठपुरावा करत असतो. यदाकदाचित हेचं दुखणं प्रशासनातील लोकांचं असावं, असं मला वाटतं. माझ्या आश्रमशाळांवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे मखरे यांनी केली आहे. माझ्या आश्रमशाळेंचे थकीत परिपोषण आहाराचे अनुदान व चालू अनुदान त्वरित वितरित करावे. तसेच माझ्या आश्रमशाळांना अपुरा असणारा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग पूर्ण क्षमतेने द्यावा. तसेच गेल्या तीन महिन्यापासून पुणे जिल्ह्यातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे अद्यापपर्यंत पगार झालेले नाहीत. त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे, तसेच कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी विविध बँकांकडून कर्ज घेतलेल्या कर्जदाराला अधिकच्या व्याजाचा भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा, यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी. तसेच माझ्या आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी निवेदनात केलेल्या मागण्या त्वरित मंजूर कराव्यात, अन्यथा मला पुन्हा एकदा मा. न्यायालयाचे दरवाजे ठोठाविण्यास भाग पाडू नका. असे मखरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

