सध्या ऑस्ट्रेलियाविरूध्द सुरू असलेल्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना गुरुवारी ७ जानेवारी २०२१ पासून सिडनीच्या एससीजी मैदानावर सुरू होत आहे. मालिकेतील पहिला कसोटी भारताने दुर्देवीरित्या गमावल्यानंतर मेलबोर्नच्या बॉक्सिंग डे कसोटीत दुय्यम दर्जाचा गणल्या गेलेल्या भारतीय संघाने कांगारूंना चारीमुंड्या चित करून मालिका बरोबरीत आणली. या विजयाने भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावणे साहजिकच आहे. प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या त्या अनपेक्षित पराभवाने मोठा धक्का बसला असणार ? दोन्ही संघ या सनसनाटी सामन्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी जेंव्हा सिडनीच्या मैदानावर उतरतील तेंव्हा त्यांच्यात जोरदार लढाईची अपेक्षा तमाम क्रिकेटप्रेमी बाळगून असणार हे नक्की !
भारताने या दौऱ्यापासून सामन्याच्या एका दिवस अगोदरच आपला अंतिम संघ जाहीर करण्याची नवी व सकारात्मक सुरू केली आहे. मेलबोर्न कसोटीत खेळलेल्या संघात भारताने दोन बदल केले असून पहिल्या दोन्ही कसोटयांत अपयशी ठरलेला मयंक अग्रवाल संघाबाहेर गेला तर जखमी वेगवान गोलंदाज उमेश यादवची जागा कसोटीत पदार्पण करणारा जलदगती गोलंदाज नवदिप सैनी घेणार आहे. नवदिप सैनी कसोटी खेळणारा भारताचा २९९ वा खेळाडू बनणार आहे. रोहीत शर्मा संघाचा नवा उपकर्णधार म्हणून नियुक्त झाला असून मयंकच्या जागेवर तो संघाची सलामी ठोकणार आहे.
हा लेख लिहीला जात असे पर्यंत ऑस्ट्रेलियाचा अंतिम संघ जाहीर झाला नव्हता. तरीही कांगारू आपल्या संघात अनुभवी सलामीवीर डेव्हीड वॉर्नरला संघात स्थान देण्याची मोठी शक्यता असून त्याच्या जोडीला नव्या दमाचा विलो पुकोवस्की पदार्पण करू शकतो. वॉर्नर १०० टक्के तंदुरूस्त नाही तरीही ऑस्ट्रेलिया त्याला खेळविण्याचा जुगार खेळणार आहे. तर बर्न्सच्या जागेवर पुकोवस्की येईल. वॉर्नर साठी हेडचा पत्ता कट होईल. ऑस्ट्रेलिया देखील या सामन्यात मागील पराभवाचा सूड घेण्यासाठी उतरणार आहे हे विसरून चालणार नाही.
रोहीत शर्मा भारतीय संघात परतल्याने फलंदाजीत बळकटी येणार आहे. परंतु मोहम्मद शमी, उमेश यादव या अनुभवी व भरवश्याच्या वेगवान गोलंदाजांच्या गैरहजेरीत भारताची वेगवान गोलंदाजी अननुभवी दिसत आहे. या संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रितु बुमराहजवळ केवळ सोळा कसोट्यांचा अनुभव आहे. तर मागच्या कसोटीत पदार्पणात पाच बळी घेणारा मोहम्मद सिराज फक्त एका कसोटीचा अनुभवी आहे. तर तिसरा जलदगती गोलंदाज नवदिप सैनीचा कसोटी अनुभव शुन्य आहे. तरीही रवींद्र जडेजा व रविचंद्रन आश्विनमुळे भारताची गोलंदाजी भारदस्त वाटत असून ऑस्ट्रेलियाला भारत दोनदा बाद करण्याची क्षमता व विश्वास बाळगून आहे. भारताचे फलंदाज आपली जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी होणे अतिशय गरजेचे आहे कारण त्यामुळे गोलंदाजांना आणखी उर्जा मिळेल.
सिडनीचे मैदान भारतीय संघाला पोषक असल्याचे सांगितले जात असले तरी या मैदानावर भारत आतापर्यंत केवळ एकच सामना जिंकू शकला आहे. त्रेचाळीस वर्षापूर्वी म्हणजे सन १९७८ मध्ये तत्कालीन कर्णधार बिशनसिंग बेदीच्या नेतृत्वात भारताने आपला एकमेव सामना एससीजीवर जिंकला आहे. त्या सामन्यात भारताने कांगारूंचा एक डाव व दोन धावांनी फडशा पाडला होता. ऑस्ट्रेलियन भूमीवरचा हा भारतातील सर्वात मोठा विजय आहे.
सिडनीच्या मैदानावर सन १८८२ रोजी पहिला कसोटी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला होता. तर भारताने डिसेंबर १९४७ मध्ये सिडनीत प्रथमच कसोटी खेळली आहे. विशेष म्हणजे तो सामना अनिर्णित राहीला होता. भारतासाठी आशादायक व उत्साह वाढविणारी बाब म्हणजे भारताने सन १९७८ मध्ये जो एकमेव सामना सिडनीमध्ये जिंकला आहे तो ७ जानेवारीला सुरू झाला होता. तर गुरुवारी सुरू होत असलेल्या कसोटी सामन्याचा दिवसाची तारीखही ७ जानेवारी आहे.
सामन्यात यशस्वी होण्याचे सर्व शुभसंकेत भारताच्या बाजूने असून भारताचा कर्णधार अजिंक्य राहणेने भारताचे नेतृत्व केलेल्या तिनही कसोटयात तो अजिंक्य राहीला आहे. त्यामुळे अजिंक्य राहणे आपली अजिंक्य राहण्याची परंपरा कायम राखण्याचीच शक्यता सध्या तरी दिसत आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

