shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

येते दोन दिवस भारतीय संघ व कर्णधार कोहली साठी काळरात्री सारखे असतील..!



                       घर के शेर असलेल्या भारतीय संघाला इंग्लंडने चेन्नई कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसापासून दबावात ठेवले असून  तिसऱ्या दिवसाअखेर सामन्यावर मजबूत पकड घेत भारताला सर्व बाजूंनी कोंडीत पकडले आहे. आता उर्वरित दोन दिवसात इंग्लंड भारताभोवती कशा प्रकारे फास आवळून भारताला मायदेशात मात देतो का ? हे बघणे मनोरंजक ठरणार आहे.  

                        इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटची ही शंभरावी कसोटी असून त्याच्यासाठी ती अविस्मरणीय ठरत आहे. रूटचा प्रTत्येक निर्णय येथे यशस्वी होत असून तो हात लावेल तेथे सोने होत आहे असा प्रकार सध्या चेन्नईच्या एम.ए. चिंदबरम स्टेडियमवर सुरू आहे. रूटने द्विशतक झळकवून अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याचबरोबर त्याने रचलेली प्रत्येक चाल फायदेशीर ठरत आहे. त्याच्या अपेक्षेनुरूप इंग्लंडने धावसंख्या रचली. तर त्याच्या गोलंदाजांनी खास करून जोफ्रा आर्चरने भारताच्या डावाच्या सुरुवातीलाच सुरुवातीला रोहीत शर्मा व शुभमन गिल या सलामीवीरांना स्वस्तात बाद करून भारताला भारताला संकटात टाकले.
                           दुसऱ्या बाजूने नवोदित फिरकी गोलंदाज डॉम बेसने कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य राहाणे, चेतेश्वर पुजारा व रिषभ पंतला बाद करत भारताला फॉलोऑनच्या दारात उभे केले. भारताच्या डावात चेतेश्वर पुजारा व रिषभ पंतने केलेल्या शतकी भागीदारीने दिवसअखेर अडीजशेचा टप्पा गाठता आला. दिवसअखेर किल्ला लढवत असलेल्या सवॉशिंग्टन सुंदर व आर आश्विन यांच्यावरच भारताची सगळी भिस्त आहे.
खास करून कर्णधार कोहली, शुभमन गिलने काहीसा बेजबाबदार फटका मारून स्वतः बरोबर संघालाही अडचणीत आणले. दुर्देवी ठरलेल्या चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियात केलेल्या खेळापेक्षा येथे चांगल्या प्रकारे तडफ दाखविली परंतु अतिशय दुर्देवी पद्धतीने बाद झाला. आपणास आठवत  असेलच ऑस्ट्रेलियात तेथील जलदगती गोलंदाजांनी त्याला बाद करण्यासाठी जंग जंग पछाडले होते. त्याच्या प्रत्येक अवयवांवर चेंडूंचा प्रसाद दिला होता. तरीही तो डगमगला नव्हता, येथे मात्र त्याने मारलेला एक जोरकस फटका क्षेत्ररक्षक वॉली पोपच्या खांदयाला लागला व त्याचा उडालेला झेल जवळच असलेल्या रॉरी बर्न्सने अलगद टिपला.
                       रिषभ पंतनेही सिडनी, ब्रिस्बेन पाठोपाठ जोरदार खेळ करत भारताला संकटातून बाहेर काढण्यास मदत केली मात्र येथेही तो शतकापासून वंचित राहीला. पंत फलंदाजीत सुंदर खेळ करत असला तरी त्याचा संघातील मुख्य जॉब यष्टीरक्षकाचा आहे. तेथे मात्र त्याच्या चुका थांबायला तयार नाहीत. इंग्लंडच्या डावात त्याने एक झेल व एक यष्टीचितची सोपी संधी दवडली शिवाय फिरकी घेतलेल्या चेंडूला अडविताना त्याची चांगलीच तारांबळ उडाली. त्या गडबडीत त्याच्याकडून बाईजच्या अवातंर धावाही गेल्या. या बाबी त्याने वेळीच सुधारायला हव्यात अन्यथा त्याच्या चांगल्या फलंदाजीवर पाणी फेरलं जाईल.
                       या सामन्यात भारताचे प्रमुख अस्त्र असलेले फिरकी गोलंदाज निष्प्रभ ठरल्याने व नंतर भरवशाच्या फलंदाजांनी दगा दिल्याने भारत फॉलोऑनच्या छायेत असून पुढील दोन दिवसात ऑस्ट्रेलियात झाला तसा चमत्कार झाला नाही तर भारताला एक अनपेक्षित असा नामुष्कीजन्य पराभवही स्विकारावा लागू शकतो.
                      या सामन्यात कर्णधार कोहली नेतृत्त्व व फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात साफ अपयशी ठरल्याने त्याच्या कुवतीविषयी शंका घ्यायला जागा निर्माण झाली असून भारत हा सामना हरला तर ऑस्ट्रेलियात बिकट परिस्थितीत मालिका जिंकणाऱ्या अजिंक्य राहाणेला कर्णधार करण्याच्या मागणीला जोर येऊ शकतो. त्यामुळे येते दोन दिवस भारतीय क्रिकेट संघ व कर्णधार विराट कोहली साठी काळरात्री सारखे आहेत.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close