shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्धवजी ठाकरे साहेब,आगामी अर्थसंकल्पात तरी वडार समाजाचा वाटा मिळेल का?

- आणखी किती अर्थसंकल्पांची वाट पाहावी लागेल साहेब, ते तरी सांगा:

प्रति,
मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,मुंबई-32

माननीय महोदय,
पत्रास कारण की,
मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब, हजारो वर्षांच्या गुलामीच्या इतिहासापासून स्वातंत्र्यानंतर अजूनही शेवटच्याच रांगेत उभा असलेला समाज. जो समाज सतत दबलेला, पिचलेला आहे. जो जिवंत असूनही वर्षानुवर्ष अस्तित्वहीन जीवन जगत आहे. यामुळे आजही तो इतर वर्गाशी बरोबरी करू शकत नाही. जो आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय अधिकाराच्या हक्काच्या कोणत्याही प्रकारे जवळ जाऊ शकला नाही किंबहुना त्याला तिथंपर्यंत जाऊ दिलं गेलं नाही. यामुळे जो आज मुख्यप्रवाहापासून लांबच फेकला जात आहे, असा वर्ग. एकीकडे देश उन्नती करत असताना दुसरीकडे हा वर्ग अत्याचाराच्या लाटेमुळे लांब फेकला जात आहे.

कष्टकरी वडार समाजाची आपली एक वेगळी ओळख आहे. बोलीभाषा आहे, संस्कृती आहे. वडार जमात ही दगडाशी संबंधित असून स्वातंत्र्याच्या या 70-72 वर्षात शासनाच्या विविध योजनांपासून अलिप्त असणारा, अर्थात शासनाच्या कुठल्याच सोयी-सुविधा वडार समाजापर्यंत आलेल्या नसल्यामुळे वडार जमातीचा या स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक विकास झाला नाही. 

महोदय, वडार समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातील वडार समाजाला S.T. आरक्षण मिळावे, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात यावे म्हणून, मागील सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी तशी घोषणाही केली. तद्वतच माजी मुख्यमंत्री महोदयांनी घोषणांचा प्रचंड पाऊस पाडला. 

तसेच वडार जमातीच्या उन्नतीसाठी भटक्या-विमुक्तांसाठी असलेल्या वसंतराव नाईक महामंडळ अंतर्गत 50 कोटींची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी मात्र अद्यापही झालेली नाही. उद्धवजी ठाकरे साहेब आपण याकडे लक्ष द्यावे ही विनंती.  

मागील सरकारच्या कार्यकाळात याच महाराष्ट्रात वडार समाजाचे भव्य दिव्य अशा स्वरूपाचे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत दोन मेळावे झाले. या दोन्ही मेळाव्यात भरघोष अश्वासनांचा, घोषणांचा नुसता पाऊस पाडण्यात आला. शासन स्तरावर आमच्यासाठी घोषित केलेल्या योजनांचा (२२ फेब्रुवारी २०१९,  संकेतांक क्र. 201902251512518622) या रोजी अधिसूचना निघाली, पण त्याचे पुढे काय झाले? त्याची अंमलबजावणी मात्र कागदावरच राहिली, अंमलबजावणी मात्र शून्य. यावरून हेच सिद्ध होते की, पुन्हा एकदा वडार समाजाच्या तोंडाला पाने पुसली गेली. हेच यावरून सिद्ध होते.

मा.महोदय, वडार समाजाची लोकसंख्या आणि सद्यःस्थितीतील शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक स्थिती पाहता वडार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे नितांत गरज आहे. जेणेकरून वडार समाजाचे विविध प्रश्न सुटण्यास मदत होईल. उद्धव ठाकरे साहेब, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी हे होईल का साहेब?

साहेब, वडार समाजातील बहुतांश  युवकांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे परंतु उच्च शिक्षणाचाचा खर्च परवडणारा नसल्यामुळे बरेच विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या संदर्भात उच्च शिक्षण घेणा-यांसाठी आणि संशोधक अभ्यासकांना सारथी, बार्टीच्या धर्तीवर अशा युवकांना स्काॅलरशीपची सोय करण्यात यावी. जेणेकरून आमच्याही उच्च शिक्षणाची सोय होईल आणि अधिकाधिक उच्च शिक्षितांची संख्या लक्षणीय ठरेल.

खरे तर भटक्या-विमुक्त प्रवर्गातील वडार जमातीसाठी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिकदृष्टया यांच्या समग्र विकासासाठी भरीव तरतुदींची आवश्यकता आहे. वडार जमातीकडे सामाजिक न्याय विभाग, बहुजन कल्याण विभाग, वित्त विभाग इत्यादींनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सामाजिक न्यायासाठी आवश्यक आहे.  
मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब, आपण याकडे लक्ष द्याल या अपेक्षेसह.. 

आपला स्नेहाकिंत,
श्रीकांत मुद्दे
वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य.
close