नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाला दिल्या सूचना: आ. शामसुंदर शिंदे
लोहा। प्रतिनिधी:
लोहा तालुक्यातील लिंबोटी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरगाव येथील शिवारातील ऊसाला अचानक आग लागून एकमेकांच्या शेजारी असलेल्या सहा शेतकऱ्यांच्या शेतातील वीस एकर मधील उभा ऊस जळून खाक झाल्याची गंभीर घटना दि.6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली होती.
या आगीत जवळपास एक हजार टन ऊस जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज असून शेतकऱ्यांचे या आगीने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ,या गंभीर घटनेची माहिती मिळताच लोहा, कंधार विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी दि .(7) फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी डोंगरगाव येथील आगीने उस शेतीची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला व उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर ,तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषी अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना डोंगरगाव येथील आगीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत व नुकसानभरपाई तातडीने मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी आ.शामसुंदर शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.
अगोदरच या ना त्या कारणाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने यावेळी आ. शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त करून मी शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी भक्कम पणे उभा असून या संकटातून सावरण्यासाठी शेतकरी बांधवानो धीर धरा असे भावनिक आवाहन यावेळी आमदार शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.आगीने ऊस शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई तातडीने मिळवून दिल्या जाईल अशी ग्वाही आमदार शामसुंदर शिंदे यांनी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी बोलताना दिली.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील,खरेदी विक्री संघ लोहा उपसभापती शाम अण्णा पवार, डोंगरगाव चे सरपंच दत्तात्रय भगाडे व शेतकरी बांधव ,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

