इंदापूर तालुक्यातील पळसदेव चे विजय बनसोडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात प्रथम..!!
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील शेतकरी पुत्र पळसदेव गावचे नाव महाराष्ट्रात नावलौकिक करणारे आणि ज्याने २०१२ पासून पुणे शहर पोलीस दलामध्ये कार्यरत असताना लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे मर्यादित विभागीय पोलीस उपनिरीक्षक परीक्षा २०१७ दिली होती. नुकत्याच त्याचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये पहिल्याच प्रयत्नात राज्यात प्रथम क्रमांकाने विजय सुनील बनसोडे उत्तीर्ण झाले .त्यांच्या या यशाने तालुक्यातील व महाराष्ट्रातील अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विजय सुनील बनसोडे हे पळसदेव गावचे असून वडील सुनिल एकनाथ बनसोडे हे शेतकरी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा प्राथमिक शाळा शिरसागरवाडी या ठिकाणी झाले. तसेच उच्च माध्यमिक शिक्षण विवेकानंद विद्यालय शाळा शिरसोडी या ठिकाणी झाले. पुढे त्यांनी पदवी पर्यंत शिक्षण आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज इंदापूर या ठिकाणी पूर्ण केले . त्यांनी त्यांचे पूर्ण शिक्षण मामा दादासाहेब कुदळे यांच्या घरी राहून पूर्ण केले.
त्यानंतर पुणे शहर पोलीस दलामध्ये २०१२ ला नियुक्ती झाली. तेव्हापासूनच ड्युटी करून कोणतेही क्लास न करता एमपीएससी चा अभ्यास चालू केला आणि खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षा २०१७ या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ४०० पैकी ३७३ मार्क मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांचे यश मिळविण्या मागे मामा दादासाहेब कुदळे. त्यांची आई मनीषा बनसुडे, वडील सुनील बनसुडे ,भाऊ अजय बनसोडे व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक नवले गुरुजी यांनी साथ दिली.
सध्या विजय बनसोडे जलद प्रतिसाद पथक पुणे शहर या ठिकाणी नोकरी करत असून त्यांना त्यांच्या सर्व स्टाफ यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहाय्याने ते यश मिळवू शकले. अशी माहिती त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करून दाखवली. ते पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व माझ्या मित्रांना मी एक संदेश देऊ इच्छितो की, अथक परिश्रम केल्यानंतर कोणाला लवकर किंवा कोणाला उशिरा यश मिळते. परंतु यश हे नक्कीच मिळणार असते. त्यामुळे यश भेटेपर्यंत परिश्रम बंद करायचे नाही. प्रयत्नाला यश नक्कीच आहे.
विजय बनसोडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत मिळवलेल्या यशाचे कौतुक होत असून विद्यार्थी आणि युवक यांना ते आदर्शवान ठरल्याचे दिसून येत आहे.

