अहमदनगर (प्रतिनिधी) :
येथिल महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील आरोग्य अधिकारी नरसिंह सर्वोत्तमराव पैठणकर या लोकसेवकाला 2 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज 17 फेब्रुवारी रोजी रंगेहात पकडले असून त्यावर तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की ,अहमदनगर महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागातील आरोग्य अधिकारी नरसिंह सर्वोत्तमराव पैठणकर याने तक्रारदार यांचे अहमदनगर महापालिका येथे मृत जनावरांच्या दहिनीचा प्रोजेक्ट असून त्या प्रोजेक्ट संदर्भात निरीच्या त्रुटी काढल्या आहेत.असे सांगून त्या तक्रारदार यांच्या राहिलेल्या बिल काढणीसाठी लोकसेवक नरसिंह सर्वोत्तम पैठणकर याने तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपये मागितले असता तडजोड होऊन 2 लाख 50 हजार रुपये ची मागणी केली होती.
आरोपी लोकसेवक पैठणकर यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने दिनांक 17 /2/ 21 रोजी सकाळी पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक किरण रासकर, पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, लाचलुचपत प्रतिबंधक नगर,नाशिक विभागाने संयुक्तपणे यशस्वी सापळा रसला व पैठणकर यास 2 लाख 50 हजार रुपयाची लाच घेताना सावेडी कचरा डेपो अहमदनगर येथे पंचायत समक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे. यासंदर्भात लाच घेताना पकडण्यात आलेला लोकसेवक नरसिंह सर्वोत्तमराव पैठणकर याच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिकचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक किरण रासकर, पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, पोलीस कॉन्स्टेबल मोरे ,कुशारे हे यांनी हा सापळा लावला, अधिक तपास पोलीस उपाधीक्षक खेडकर हे करत आहेत.

