शेतकर्यांची वीजजोडणी पूर्ववत करा अन्यथा आंदोलन - हर्षवर्धन पाटील..!!
इंदापूर:प्रतिनिधी( दि. १२ /२/ २०२१)
कोरोनाची पार्श्वभूमी, अतिवृष्टीचे संकट असे अनेक संकट असताना या सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वीज आकारणी भरमसाठ केल्याने तसेच त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भारतीय जनता पक्षाने यापूर्वी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी दोन वेळा आंदोलन केले असून पूर्ववत वीज जोडली नाहीतर रस्त्यावर येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी दिला आहे.
इंदापूर येथे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले,' शेतकऱ्यावर वीज आकारणी मोठ्या प्रमाणात केली असून या वीज आकारणी बरोबरच अधिभार, सर्चभार यासारखे चार प्रकारची आकारणी केली आहे. इंदापूर तालुक्यात ५० टक्क्यापेक्षा जास्त फिडर हे शेती आणि गावठाण असे संयुक्त असून शेतीचे वीज कनेक्शन तोडल्याने गावाचा पाणीपुरवठा सुद्धा बंद झाला आहे ही वस्तुस्थिती आहे. ऊर्जा खात्याच्या मंत्री महोदयांशी माझे बोलणे झाले असून निवेदन दिले आहे. या पूर्वी दोन आंदोलने भाजपच्या वतीने तालुक्यामध्ये करण्यात आले असून येत्या दोन दिवसात लाईट जोडणी पूर्ववत झाली नाही तर मात्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने रस्त्यावर येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिला.

