भारताने चेन्नईच्या चेपॉक स्टेडीयमवर इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या दुसऱ्या कसोटीत एक धमाकेदार विजय मिळवून मालिकेत एक - एक अशी बरोबरी साधली व कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. भारताने इंग्लंडला दिलेले ४८२ धावांचे लक्ष गाठण्यात त्यांना अपयश आले. इंग्लंडच्या संघाला या प्रयत्नात जेमतेम १६४ धावाच काढता आल्या. त्यामुळे त्यांना ३१७ धावांनी पराभूत व्हावे लागले. भारताचा हा इंग्लंडवरील धावांनी मिळविलेला सर्वात मोठा विजय आहे.. या सामन्याचे खास वैशिष्टये म्हणजे भारताने पहिल्या डावात बनविलेल्या ३२९ इतक्या धावा इंग्लंडला दोनही डावात मिळून बनविता आल्या नाहीत. इंग्लंडचा पहिला डाव १३४ व दुसरा डाव १६४ धावात आटोपला. म्हणजे दोन्ही डावात मिळून त्यांच्या केवळ २९८ धावाच धावफलकावर लागल्या.
सामन्याच्या पहिल्या दिवसापासून येथील खेळपट्टी चर्चेचा विषय बनली होती. पहिल्या डावात भारताने चांगल्या पैकी फलंदाजी केल्यानंतर भारतीय फिरकी गोलंदासमोर इंग्लंडची दाणादाण उडाली. तरीही त्यांनी कसाबसा फॉलोऑन वाचविला. त्यानंतर इंग्लिश समर्थक या खेळपट्टीच्या करामतीवर अपहासात्मक टिका करू लागले. परंतु भारताच्या दुसऱ्या डावात कोहलीचे अर्धशतक रवीचंद्रन आश्वीनच्या खणखणीत शतकाने सामन्याचा नूर तर बदलविलाच शिवाय इंग्लिश टीकाकारांचे तोंड बंद केले.
भारताच्या आश्वीनने सामन्यात आठ बळी घेऊन व शतक ठोकले. कसोटीत शतक व दहा बळींच्या विश्वविक्रमी टप्प्यावर आश्वीन आला होता परंतु कर्णधार कोहलीने चौथ्या दिवशी त्याला कमी गोलंदाजी दिल्यामुळे या महापराक्रमा पासून वंचित राहावे लागले.
भारताच्या पहिल्या डावात संघ अडचणीत असताना सलामीवीर रोहीत शर्मा व उपकर्णधार अजिंक्य राहाणेने केलेली १६२ धावांची भागीदारी सामन्याला भारताच्या बाजूने झुकविण्यात महत्वाची सिध्द झाली.
हा विजय भारताचा सांघिक कामगिरीचा असला तरी या विजयात विशेष मोलाची कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर टाकू या.
भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने दुखापत व मागील काही सामन्यातील अपयश बाजूला ठेवून या सामन्याच्या पहिल्या डावात २३१ चेंडूत १८ व २ षटकारांच्या मदतीने ठोकलेल्या १६१ भारताच्या विजयातील उठावदार कामगिरी होय. शिवाय दुसऱ्या डावातील त्याच्या २६ धावाही संघासाठी बहुमुल्य ठरल्या.
चेन्नईचाच स्थानिक खेळाडू असलेल्या आर.आश्वीनला घरचं वातावरण चांगलंच रास आलं. या सामन्यात क्रिकेट देवता त्याच्यावर चांगलीच प्रसन्न दिसली. इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने ४३ धावात ५ तर दुसऱ्या डावात ५३ धावात तीन बळी घेतले. तर भारताच्या दुसऱ्या डावात आठव्या क्रमांकावर येत जोरदार शतक ठोकून सामनावीर किताब पटकविला. त्याची १४८ चेंडूतील १४ चौकार एका षटकाराने सजविलेली खेळी अतिशय लाजवाब होती.
चेन्नईलाच झालेल्या पहिल्या कसोटीतच पदार्पण निश्चित असताना ऐनवेळी झालेल्या दुखापतीमुळे त्या सामन्यास मुकावे लागतेल्या अक्षर पटेलने या सामन्यात संधी मिळताच पहिल्या डावात ४० धावात २ तर दुसऱ्या डावात ६० धावात पाच बळी अशी शानदार कामगिरी करत एकूण ७ बळी टिपले.पदार्पणातच ५ बळी मिळविण्याची करामत करणारा तो भारताचा ९ वा गोलंदाज बनला. एकंदर भारताचा ३०२ वा कसोटीपटू ठरला.
पहिल्या डावात भारत ३ बाद ८६ असा अडचणीत असताना अजिंक्य राहणेने संयमी व जिगरबाज खेळ करत १४९ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. त्याच २ वेळी दरम्यान रोहीत शर्मासह केलेली १६२ धावांची भागीदारी भारतीय डावाला मजबूती देऊन गेली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या दोन कसोटीत चांगली फलंदाजी करणाऱ्या रिषभ पंतने भारताच्या पहिल्या डावात नाबाद ५८ धावा ठोकून आपला फॉर्म दाखविला. शिवाय यष्टीरक्षणात सुधारणा करत टिपलेले काही झेल व इंग्लिश फलंदाजांना चपळाईने केलेले यष्टिचित भारताच्या विजयासाठी मोलाचे ठरले.
कर्णधार विराट कोहली पहिल्या डावात शुन्यावर बाद झाला असला तरी दुसऱ्या डावातील त्याची ६२ धावांची खेळी त्याचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत करेल. कर्णधार म्हणून त्याला नेतृत्वात सुधारणा करण्यास आणखी वाव असून कोणत्याही खेळाडू बद्दल दूषित पूर्वग्रह त्याने बाजूला ठेवल्यास त्याच्याच नेतृत्वाचा आलेख वाढेल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

