पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा गावात राजकीय वैमनस्यातून शेतकरी नेते शशिकांत भाऊसाहेब अडसूळ (वय- ४०) यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. उपसरपंचपदाची संधी हुकल्याने सागर कोरडे व स्वप्नील जराड यांनी हा हल्ला केला आहे.सागर कोरडे याचा ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
आज सरपंच, उपसरपंच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नऊपैकी पाच सदस्य सहलीला गेले होते. त्यामुळे जराड यांची उपसरपंचपदाची संधी हुकली. या रागातून त्यांनी शशिकांत भाऊसाहेब अडसूळ यांच्यावर चाकूने हल्ला केला. सदर हल्ल्यात अडसूळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मानेवर तीन वार तर पाठीवर दोन वार करण्यात आले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

