अमरत्व प्राप्त करण्यासाठी जिवंतपणी मृत्यूला मारावे लागते किंवा आपण देशासाठी अथवा समाजासाठी मरण पत्करावे लागते. या जीवनामध्ये सर्वात मौल्यवान गोष्ट ही अमरत्व आहे.
जन्माला आलेला प्रत्येक जीव मरणार हे निश्चित आहे आणि हा निसर्गाचा नियम आहे. आपला मृत्यू हाच आपल्याला अमरत्व देणारा आहे, हे देशासाठी जगणाऱ्याला आणि मरणार्यालाच माहीत असते. आज देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकाचा प्रत्येक सेकंद हा तलवारीच्या पात्यावर उभा राहिल्यासारखा असतो. कोणत्या क्षणाला हल्ला होईल आणि कोणत्या क्षणाला गोळी लागेल, याचा काहीच भरवसा नसतो.
ज्यांच्या सर्वोच्च त्यागावर आपण सुरक्षित आणि सुखात असतो, त्यांच्याविषयी आपल्या मनात आपल्या आईवडिलांइतकाच आदर भाव असला पाहिजे आणि देवा इतकीच श्रद्धा असली पाहिजे.
भारताच्या सुरक्षेसाठी आपल्या तारुण्यातील ऐन उमेदीचा काळ हे सर्व जवान देश सेवेसाठी अर्पण करीत असतात. त्यांच्या या त्यागाचा आपण सर्वसामान्य नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी त्यांना सर्वोच्च मान देऊन सतत गौरव करायला हवा.
ज्या भगिनीने आपले सौभाग्य, कुंकू, मंगळसूत्र सीमेवर डावावर मांडले आहे. त्या सैनिकाच्या अखंड सौभाग्यवती असलेल्या पत्नीला कोणत्याही कार्यक्रमात सर्वप्रथम कुंकू लावण्याचा मान प्रत्येक गावातील माता-भगिनी द्यायला हवा. सैनिकांच्या कुटुंबीयांना आपण सर्वसामान्य माणसांनी, आपण ज्या क्षेत्रात काम करत असू, त्या क्षेत्रातील सेवा मोफत द्यायला हवी.
प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अशा राष्ट्रीय सणाच्या वेळी सैनिकांच्या आई-वडिलांचा आणि सैनिकांचा प्रत्येक गावात दरवेळी सत्कार करायला हवा.
जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने सैनिकांच्या आईचे किंवा पत्नीचे जिजाऊ पूजन करायला हवे. शिवजयंतीला सैनिकांचे शिवपूजन करायला हवे.
दिवाळीच्या भाऊबीजेला आपल्या गावातील सैनिकाच्या पत्नीची भाउबीज सर्व गावकऱ्यांनी करायला हवी कारण दिवाळीच्या सणाला सुद्धा तिचा पती आपल्या दिवाळीसाठी सीमेवर उभा असतो.
कामधेनू सेवा परिवार आणि शिवभक्त परिवार इंदापूर या दोन्ही संस्थांनी गेल्या चार वर्षापासून हे उपक्रम सुरू केले आहेत.
आज इंदापूर तालुक्याचा सुपुत्र *अमर शहीद सुभेदार लक्ष्मण सतु डोईफोडे* हे आसाम येथे संरक्षण सेवेत असताना, त्यांचे अमर बलिदान झाले आहे. उद्या सकाळी आठ वाजता त्यांचे पार्थिव बोराटवाडी या त्यांच्या मूळ गावी येत आहे, नऊ वाजता शासकीय इतमामात आणि बंदुकीच्या फायरिंग सलामी मध्ये या वीराला अंतिम निरोप दिला जाणार आहे.
*तिन वेळा आपल्या सेवेचा कालावधी वाढवून घेऊन या वीराने आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे.*
आपण सर्वांनी या महान त्यागी बंधूचे अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थित असायला हवे, हे आपले सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे.
आज आपल्या ताटातील प्रत्येक घासाला अशा सैनिकांच्या अलौकिक त्यागाचा स्पर्श आहे. आपल्या जीवनाच्या सर्व प्रकारच्या सुखाला या सैनिकांच्या त्यागाची किनार आहे. आज माझ्या घरातीलच एक व्यक्ती अमर तत्वात विलीन झाली आहे, हा भाव प्रत्यक्षात आपल्या कृतीत उतरायला हवा. आज पासून त्यांच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीला आपण सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत याची खात्री पटली पाहिजे, ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.
मरणार तर सर्व जण आहोत पण असे मरण स्वीकारायला सिंहाचे काळीज असावे लागते. आज असा नरसिंह आमच्या तालुक्यात जन्मला, ज्याच्या नावापुढे कधीही कोणीही कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी असा शब्द लावू शकणार नाही. त्याच्या नावापुढे सदासर्वकाळ अमर शहीद असाच शब्द राहील. याचा आम्हाला कायम अभिमान वाटत राहील.
मरण माझे मरून गेले l मज केले अमर ll
ठाव पुसिले बूड पुसिले l ओस ओसले देहभाव ll
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.
मो.नं.9822292713.

