मी गणेश सखाराम जावळे, बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कोनड खुर्द गावातील शेतकरी. शासनानं बांधावर खतपुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय मला पेरणीसाठी खूप उपयोगी ठरला आहे.
कोरोनाच्या कठीण काळात लॉकडाऊन सुरू असताना संपूर्ण जग जणू स्तब्ध झालं. मान्सून मात्र वेळेवर पोहोचण्याचे संकेत येत होते. सगळे व्यवहार ठप्प झालेले असताना पेरणीचे दिवस तोंडावर आले. खताचा पुरवठा कसा होणार? असा प्रश्न पडला होता. खताचा तुटवडा पडणार, वेळेवर उपलब्ध होणार नाही, भरमसाठ भाववाढ होवून जादा पैसे देऊन खत घ्यावे लागणार, अशा अनेक अफवा ग्रामीण भागात ऐकायला येत होत्या. अशात एक सकारात्मक बातमी राज्य शासनाच्यावतीने प्रसिद्ध झाली. ती म्हणजे खते उत्पादक कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना बांधावर खताचे वाटप करता येणार असल्याची! शासनाच्या या निर्णयाला अनुसरून शेतकरी वर्गाची पायपीट होवू नये म्हणून जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी प्रोत्साहन दिले. जिल्ह्यातील विविध उत्पादक कंपन्या व शेतकरी विकास गट हे बांधावर खत वाटप योजनेत काम करण्यासाठी समोर आले.
या योजनेतंर्गत आमच्या इथं आभाळमाया ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी लि.च्यावतीने भागधारक शेतकऱ्यांकडं खताच्या मागणीनुसार संयुक्त मागणीपत्र तयार करण्यात आलं. भागधारक शेतकऱ्यांकडून एक गठ्ठा सरदार १२:३२:१६ या खताची मागणी करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनात 'ना नफा ना तोटा' तत्वावर खताचा पुरवठा चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना करण्यात आला. यामध्ये शेतकरी बांधवांना होलसेल भावात खत मिळाल्यानं २५-३० रूपये आणि घरपोच खत मिळाल्याने गाडी भाडे, हमालीचे प्रती बॅग २०-२५ रूपये असे एकूण ४५-५५ रूपयांची प्रती बॅग बचत झाली. कृषी विभागाच्या पुढाकारानं लॉकडाऊनच्या कठीण काळात आम्हा शेतकऱ्यांना घरपोच होलसेल भावात खत उपलब्ध झाल्यानं आम्हाला फार मदत झाली. आम्ही शासनाचे खूप खूप आभारी आहोत.
लाभार्थी : गणेश सखाराम जावळे,
कोनड खुर्द, ता. चिखली, जि. बुलडाणा


