श्रीरामपूर :श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी रोडवर मध्यवर्ती भागात असणाऱ्या प्रेमाचा चहा या दुकानाला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत दुकानाच्या लागून असलेली गॅलरी पूर्णपणे जळून खाक झाली.
श्रीरामपूर शहरामध्ये संध्याकाळच्या वेळेला खरेदी करणाऱ्या नागरिकांची व वाहनांची गर्दी राहते. अशातच नेहमीच वर्दळीच्या असणाऱ्या या रोडवर नुकत्याच एका जिल्हापातळीवर निवडणुकीत बिनविरोध झालेल्या नेत्याच्या स्वागतासाठी त्याच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात फटाके आणि आतिषबाजी केली. फटाके आणि अतिषबाजी नंतर काही काळातच जवळच असणाऱ्या ‘प्रेमाचा चहा’ या दुकानाला आग लागल्याचे निदर्शनास आले.
आग लागताच आसपासच्या नागरिकांची धावपळ उडाली. या आगीचे स्वरूप इतके भीषण होती की मोठा अनर्थ होण्याची भीती या वेळी वाटत होती. मात्र सुदैवाने तेथूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या श्रीरामपूर नगर परिषदेचे फायर ब्रिगेड वेळेवर आल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही .अद्याप पर्यंत ही आग कशामुळे लागली ते स्पष्ट झालेले नाही. परंतु बिनविरोध निवडून आलेल्या नेत्याच्या स्वागतासाठी उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे ही आग लागली असल्याचे चर्चा सध्या शहरात होत आहे.


