shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोहीत शर्मा - अजिंक्य राहाणेने भारताला सुस्थितीत आणले..!!

चेन्नईत सलग दुसरी कसोटी खेळताना भारताने पहिल्या कसोटीत झालेल्या दारुण पराभवाचा लवलेशही पहिल्या दिवशी जाणवू दिला नाही. मागच्या कसोटीत संघ निवडताना घातलेला घोळ व केलेला गोंधळ या वेळी कोहली व कंपनीने दुरुस्त केला. अपेक्षेप्रमाणे शाहबाज नदिमच्या जागेवर अक्षर पटेलला पदार्पणाची संधी मिळाली, मागच्या दोनही कसोटयात फलंदाजीत भारताची लाज राखणाऱ्या वॉशिंगटन सुंदरला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला तर भारताचा अव्वल जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराहा वर्कलोडच्या ऑप्शनमुळे संघात निवडला गेला नाही.
                         

मागच्या सामन्यात रूसलेली नाणेफेक यावेळी कोहलीच्या बाजूने हसली. मात्र भारताचा डाव सुरू होताच सलामीवीर शुभमन गिल शुन्यावर परतताच संघासाठी अशुभ तर होणार नाही ना ? असा सवाल डोक्यात वळवळला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून धावा कमी पण संघाचा डोलारा जास्त जबाबदारीने सावरणारा चेतेश्वर पुजाराही २१ धावांवर परतला. तो धक्का बसला असतानाच कर्णधार कोहलीही शुन्यावर बाद होताच स्टेडीयममध्ये स्मशान शांतता पसरली. कोहली सलग दुसऱ्या डावात बोल्ड झाला. संघाला एकामागोमाग एक धक्के बसत असले तरी मागच्या कसोटीतील अपयशी फलंदाज रोहीत शर्माने उग्र रूप धारण केले होते. त्याच्या जोडीला उपकर्णधार अजिंक्य राहाणे आला. तोही पहिल्या कसोटीत दोन्ही डावात मिळून केवळ एक धाव बनवू शकला असल्याने त्याला तर वगळण्याची मागणी चालू होती. परंतु रोहीत - राहाणे या मुंबईकर जोडीने मागील अपयशाचा कोणताही विचार न करता संयमी आक्रमण करत धावा बनविल्या व भारताची पडझड थांबवली. 
               

यामध्ये रोहीत शर्माच्या धावांचा वेग इतका भन्नाट होता की, संघाच्या १४७ धावा झाल्या तेंव्हा त्याचं शतक झालं होतं. शतकानंतरही त्याची धावांची भूक तशीच होती. तो द्विशतक करेल असे वाटत असताना २३१ चेंडूत ७० च्या स्ट्राईक रेटने १८ चौकार व २ षटकारांसह १६१ धावांवर बाद झाला. 
                 
रोहीतसह १६२ धावांची भागीदारी करणारा अजिंक्य राहाणेही ६७ धावा काढून बाद झाला. या दोघांनी भारतीय डावाला मजबूती तर दिलीच परंतु त्यांच्यावर टिकेची झोड उठविणाऱ्या टिकाकारांची तोंडे बंद केली.
                   

रोहीत व राहणेच्या पतनानंतर रिषभ पंत व रवीचंद्रन आश्वीन यांनी खेळाची सुत्रे आपल्या हाती घेतली. परंतु इंग्लिश कर्णधार ज्यो रूटने आश्वीनला बाद करत आपले बळींचे खाते उघडले. दिवसअखेर रिषभ पंत ३३ व पदार्पणवीर अक्षर पटेल ५ धावांवर नाबाद होते.
                   

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ही जोडी व त्यानंतर येणारे इशांत शर्मा, मोहम्मद सिराज व कुलदिप यादव भारताचा डाव कुठपर्यंत लांबवितात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
                     

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर  फिरकीला साथ देणारी खेळपट्टी बनणार हे उघड होते, आणि झालेही तसेच. या सामन्याची खेळपट्टी अवघ्या एका तासात फिरक घ्यायला लागली. रोहीत शर्मा व अजिंक्य राहणेने तिच्यावर साहसी खेळ केल्याने पहिल्या दिवसअखेर तरी भारताचे विशेष असे काहीही नुकसान झाले नाही. इंग्लंडच्या जॅक लिच व मोईन अली या फिरकीपटूंनी चांगल्या पैकी बळी मिळवून दोन दोन बळी मिळविले. उदया याच्याही पेक्षा खेळपट्टी आपले स्वरूप बदलणार असून इंग्लंडच्या खेळाडूंची खरी सत्वपरीक्षा असणार आहे. इंग्लिश संघ तयारीनिशीच मैदानात उतरणार असल्याने त्यांच्याकडून कडव्या प्रतिकाराची अपेक्षा आहे. त्यांच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीचा सांभाळून मुकाबला केला तर त्यांचं या कसोटीत भविष्य उज्वल असेल अन्यथा भारतीय संघ मालिका बरोबरीत करण्याची संधी सोडणार नाही.


लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close