shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्हॅलेंटाईन डे ला खेळपट्टीने केले भारतीय गोलंदाजांवर प्रेम..!!

चेन्नईच्या एम.ए चिदंबरम स्टेडीयमवरील खेळपट्टीने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी  व्हॅलेंटाईन डे ला गोलंदाजांवर भरभरून प्रेम केले. रवीवारी दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने सहा बाद ३०० वर आपला डाव सुरू केला. आणि जेमतेम २९ धावात राहीलेले चार गडी तंबूच्या आसऱ्याला गेले. आश्चर्याची बाब म्हणजे कालचा नाबाद फलंदाज रिषभ पंत ५८ धावांवर नाबाद राहीला. आजच्या २९ पैकी २५ धावा पंतच्याच बॅटमधून निघाल्या. भारताच्या पहिल्या डावाचे वैशिष्टये म्हणजे रोहीत शर्माचे धडाकेबाज दिडशतक व अजिंक्य राहाणे सोबत केलेली १६२ धावांची भागीदारी होय. या सामन्यात दिल्लीचे चार खेळाडू खेळत असून त्यापैकी शुभमन गिल, कर्णधार कोहली व इशांत शर्मा शुन्यावर बाद झाले तर पंत अर्धशतक करून नाबाद राहीला.
      
                
इंग्लंडने आपला पहिला डाव सुरू केल्यानंतर भारताप्रमाणेच त्यांनीही शुन्यावरच पहिला फलंदाज गमावला. उपहाराला त्यांनी चार महत्वाचे फलंदाज गमावले होते, तेंव्हाच कळून चुकले होते की इंग्लंडपुढील आव्हान सोपे नसणार. उपहार ते चहापान या सत्रातही त्यांचे आणखी ४ गडी बाद झाले. तर राहीलेले २ फलंदाज चहापानानंतर लगोलग बाद झाले. 
                     
चेन्नईच्याच पहिल्या कसोटीत महाराजा सारखी फलंदाजी करणारे इंग्लिश फलंदाज या सामन्यात भारतीय गोलंदाजांचे गुलाम वाटत होते. भारतीय गोलंदाज इंग्लिश फलंदाजांना पाहीजे तेंव्हा बाद करत होते. पहिल्या कसोटीत स्वीप शॉटचा शिताफीने वापर करणाऱ्या ज्यो रुटचा आज त्याच फटक्याने घात केला. कसोटी पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने त्याला बाद करून आपल्या कसोटी बळींचे खाते उघडले.
                      
भारताकडून रविचंद्रन आश्विनने सलग दुसऱ्यांदा डावात पाच बळी घेतले. या दरम्यान त्याच्या कसोटी बळींची संख्या ३९१ वर पोहचली तर इंग्लंडचा शेवटचा फलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला बाद करून सर्वाधिक २०० वेळा डावखुऱ्या फलंदाजांना बाद करणारा तो पहिला गोलंदाज बनला. आश्वीनला अक्षर पटेल व इशांत शर्माने प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराजने एक गडी बाद करून मोलाची साथ दिली. सिराजची हि भारतातली पहिलीच कसोटी असून त्याने भारतात टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळविण्याचा कारनामा केला.
                        
इंग्लंडचा पहिला डाव जेमतेम १३४ धावात आटोपला. गमतीची गोष्ट म्हणजे इंग्लंडच्या ११ फलंदाजानी मिळून केलेल्या या धावा भारताच्या रोहीत शर्माने एकटयाने केलेल्या १६१ धावांपेक्षा २७ धावांनी कमी राहील्या.
                           
गेले दोन वर्ष कुलदिप यादव भारतीय संघासोबत दौऱ्यावर असतो परंतु त्याला अंतिम संघात संधी मिळत नव्हती. याच मालिकेतील पहिल्या कसोटीत खास करून भारताच्या फिरकी गोलंदाजांची फार मोठी परवड झाली. त्यानंतर कुलदिपला संघात न घेतल्याने संघ प्रबंधानावर सडकून टिका झाली होती. त्यामुळे त्याला या सामन्यात संधी दिली खरी पण त्याला जेमतेम सहा षटकेच गोलंदाजी देऊन त्याची बोळवण केली. इंग्लिश फलंदाज जेमतेम ६० षटके खेळली. इतर गोलंदाज चांगल्या पैकी चालले त्यामुळे ही बाब कुणाच्या लक्षात आली नाही. मात्र त्याला जी सापत्न वागणूक दिली जाते ती बाब योग्य नाही. कुलदिपसारख्या गुणी गोलंदाजाला आत्मविश्वास दिला तर रिषभ पंत प्रमाणे जोरदार कामगिरी करण्याची त्याच्यात क्षमता आहे. तेंव्हा संघचालविणाऱ्या धुरंधरांनी देशहिताचेच निर्णय प्राधान्यक्रमाने घ्यावेत.
                       
भारताला १९५ धावांची आघाडी मिळाली असून दुसऱ्या डावात शुभमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला. दिवसअखेर भारताची १ बाद ५४ अशी स्थिती असून भारताकडे २४९ धावांची आघाडी असून सामन्याचे तीन दिवस बाकी आहेत. शिवाय हवामानही चांगले राहाण्याचा अंदाज असल्याने दुसऱ्या डावात भारताने मोठी धावसंख्या उभारून इंग्लंडला मोठया धावांच्या बोजा खाली दाबून टाकावे व मालिकेत १-१ अशी बरोबरी करावी अशी समस्त देशवासीयांची अपेक्षा पूर्ण करावी.

डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close