केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :- अखंड हिंदुस्थानचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल शुक्रवारी केज शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आदर्श पत्रकार संघ केज यांनी केज येथील शासकीय विश्रामगृह येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली.
समर्थ नगर, वकीलवाडी केज येथे शहीद रामदास प्रतिष्ठान यांच्या वतीने व शिवाजी ( अप्पा) हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष बबलू साखरे, विजय वनवे, कवी गायकवाड व विजय अंडील यांनी हनुमान मंदिर वकीलवाडी येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती ह्या जयंतीचे प्रमुख आकर्षण होते. केज मधील अनेक मान्यवर व्यक्ती वकीलवाडी येथील जयंती कार्यक्रमात सहभागी झाले होते.
क्रांती नगर, विठ्ठल नगर भागात शिवसेनेचे शहरप्रमुख बालाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश चाळक, युवा नेते मनोज पवार, मंगेश पवार, भैय्या जाधव ( DJ ) , महेश मुळे व धुमक बंधू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य व आकर्षक मुर्ती तसेच विद्युत रोषणाई व किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आले होते. या नंतर भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने असमंत दुमदुमून टाकला.

