इथेनॉलच्या मिश्रणाचे प्रमाण 20 टक्के हवे - हर्षवर्धन पाटील
फोटो:- नवी दिल्ली येथे नितिन गडकरी यांचेशी हर्षवर्धन पाटील यांनी इथेनॉलच्या अडीअडचणी संदर्भात चर्चा केली.
-दिल्लीत नितीन गडकरींशी चर्चा
इंदापूर: प्रतिनिधी (दि.१० मार्च २१)
इथेनॉलचे इंधनामधील मिश्रणाचे प्रमाण २० टक्के पर्यंत वाढविण्यात यावे, तेवढे इथेनॉल तयार करण्याची क्षमता साखर उद्योगांमध्ये आहे, अशी मागणी भाजप नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय मंत्री गटाचे सदस्य व रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचेकडे नवी दिल्ली येथे बुधवारी(दि.१०) भेटून केली.
सध्या इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण सुमारे १० टक्के असून त्यानुसार ऑइल कंपन्यांनी प्रतिवर्षी ५०० कोटी लिटर इथेनॉलच्या निविदा काढल्या आहेत. पाच वर्षासाठी २५०० कोटी लिटरच्या निविदा काढण्याचे धोरण ऑइल कंपन्यांनी जाहीर केले आहे. जर इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 20 टक्के केले तर वर्षाला १००० कोटी लिटर इथेनॉलच्या निविदा काढाव्या लागतील व पाच वर्षात ५००० कोटी लि. एवढे इथेनॉल पुरवण्याची क्षमता सध्या देशात आहे. साखर उद्योगाबरोबरच मका, भात, बिट पासून इथेनॉल तयार करता येते, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २० टक्के पर्यंत वाढविण्यास केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री गडकरी यांनी नमूद केल्याचे पाटील यांनी सांगितले.
तसेच सध्या ऑइल कंपन्यांच्या ठिकाणी साखर कारखान्यांच्या इथेनॉलचे टॅंकर लवकर खाली करून घेतले जात नाहीत, अशी अडचण हर्षवर्धन पाटील यांनी नितीन गडकरी यांना सांगितली. त्यावरती मंत्रिगटाच्या होणाऱ्या बैठकीत ऑइल कंपन्यांना वेळेवर टँकर खाली करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे मंत्री गडकरी यांनी स्पष्ट केले.
_______________________________

