विज चालू करून बिलांची थकबाकी वसुली करावी.. - इंदापूर तालुका शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी..!!
इंदापूर प्रतिनिधी:महावितरण कडून सध्या इंदापूर तालुक्यातील थकीत वीज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या पाठीमागे तगादा चालू असून ज्यांची वीज बिले थकीत आहेत अशांची वीज खंडीत करण्यात येत आहे.या मुद्यावरुन इंदापूरात सत्ताधारीच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
इंदापूर महावितरण कडून सध्या गव्हा बरोबर कीडे रगडले जात आहेत असाच प्रकार सुरु असून काहींनी वीज बिले भरलेली असताना त्या रोहित्रा वरील इतर शेतकऱ्यांनी बिले न भरल्याच्या कारणावरुन वीज बिल भरलेल्या शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याने इंदापूर शिवसेना आक्रमक झाली आहे. इंदापुर तालुक्यातील वीजबील थकबाकीच्या वसुलीची ही पद्धत न बदलल्यास महावितरणाच्या विरोधात आंदोलन करु असा इशारा उपकार्यकारी अभियंता उपविभाग महावितरण इंदापूर यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
सोमवारी (दि.२२) रोजी इंदापूर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने इंदापूर महावितरण उपअभियंता रघुनाथ गोफणे यांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला. इंदापूर महावितरण कडून तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा थेट आरोप या शिष्टमंडळाने केला. वीज खंडीत करण्याची हि पध्दत चुकीची असून यामुळे शेतकरी वेठीस धरला जात असल्याचे तालुका प्रमुख नितीन शिंदे यांनी म्हटले आहे.
सध्या जगामध्ये कोरोनाचे थैमान घातले आहे व त्यामुळे सामान्य जनता/शेतकरी मेटाकुटीस आले आहेत . सध्या सगळीकडे वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी जोरदार मोहिम सुरू आहे. त्यामुळे ज्या लोकांनी पैसे भरले आहेत किंवा पुर्वीपासुन नियमीत पैसे भरत आहे अशा शेतक-यांना सुध्दा वीज मिळत नाही. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचे व पिण्याच्या पाण्याची फार मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे एखाद्या रोहित्रा वरील ५०% शेतकरी पैसे भरण्यास तयार असतात तर ५०% शेतकरी पैसे भरू शकत नाहीत, त्या ठिकाणी शेतक-यांमध्ये वाद निर्माण होऊ लागले आहेत. शिवाय आपण एकट्याने पैसे भरून आपल्याला वीज मिळत नाही म्हणुन काही शेतकरी पैसे भरायचे थांबले आहेत.
सध्या नुकतेच उजनीतुन भीमा नदी पात्रात आर्वतन सोडले आहे.त्यामुळे नदी काटच्या शेतक-यांची पाणी असुनही हाता तोंडाशी आलेली पिके जळू लागली आहेत. तसेच काही रोहित्रा वरती वाड्या वस्ती वरील वीज जोडणी आहे. रोहित्र बंद झाल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.त्याचप्रमाणे काही शेतक-यांना सरास वाढीव बील आकारले आहे.म्हणजेच ज्या शेतक-यांची ५ एच.पी.मोटर आहे त्या शेतक-याला १० एच. पी.चे वीज बील आले आहे. अशी सर्व बिले दुरुस्त करून मिळावीत.त्यामुळे वीज बंद करून थकबाकी वसुली करण्यापेक्षा वीज सुरू ठेवून थकबाकी वसुल करावी व शेतक-यांची होणारी अडवणुक पिळवणुक त्वरीत थांबवावी अशी मागणी इंदापूर शिवसेनेने केली आहे. असे न झाल्यास आपल्या महावितरण अधिका-यांच्या विरोधात वेगळा मार्ग अवलंबावा लागेल असा सूचक इशाराही या लेखी निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

