shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारत मालिका विजयासह ऐतिहासीक पराक्रम करणार ?



                      भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा व अंतिम कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर ४ मार्च पासून खेळला जाणार असून या सामन्यातील भारताच्या विजयाने अनेक विक्रम घडणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे या विजयाने भारत इंग्लंडविरूध्द चालू असलेली मालिक ३-१ अशी जिंकेल. त्याच बरोबर विश्व कसोटी अजिंक्यपदाची फायनल खेळण्याचे भारताचे स्वप्न सत्यात उतरेल. 

                      जगातील सर्वात मोठे स्टेडीयम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवरच झालेला तिसरा सामना अवघ्या पावणे दिवसात जिंकल्याने भारतीय संघ या सामन्यात उंच मनोधैर्याने उतरणार असल्याने भारताच्या विजयाच्या आशा रुंदावल्या आहेत.
                     अहमदाबादमध्ये होणाऱ्या या कसोटी सामन्याद्वारे भारत आपल्या कसोटी खेळण्याच्या इतिहासात आणखी एक सोन्याचा अध्याय लिहीणार आहे. तो म्हणजे भारत कसोटी क्रिकेट इतिहासात ५५० कसोटी खेळणारा चौथा देश बनणार आहे. या पूर्वी हा मान इंग्लंड १०३३ कसोटी, ऑस्ट्रेलिया ८३४ कसोटीव वेस्ट इंडिज ५५२ कसोटी यांनाच जातो.
                     या सामन्यातील विजय भारताला मालिका विजय मिळवून देईलच, पण या मालिका विजयाबरोबरच भारत मायदेशात सलग सर्वाधिक मालिका जिंकणारा देश ठरेल. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने स्वत:च्या मायभूमित दोन वेळा सलग १० -१० कसोटी मालिका जिंकण्याचा करिश्मा केला आहे.
                        सन २०१३ पासून भारत आतापर्यत सलग १२ कसोटी मालिका मायदेशात जिंकला आहे. या कालावधीत भारताने भारतात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, श्रीलंका व अफगाणिस्तान यांना हरविले आहे. आयर्लंड, झिंबाब्वे व पाकिस्तान हे कसोटी खेळणारे देश या कालावधीत भारतात कसोटी खेळलेच नाहीत. भारताला भारतात हरविण्याचा पराक्रम सन २०१२- -१३ मध्ये करणारा देश होता इंग्लंड ! परंतु या दौऱ्याची विजयाने सुरुवात करणाऱ्या इंग्लंडची नंतर चांगलीच गाळण उडाली.
                       कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा साठावा सामना असून भारताचे सर्वात जास्त कसोटयात नेतृत्व करणाऱ्या एम.एस धोनी याच्या ६० कसोटींची बरोबरी कोहली या सामन्याद्वारे करणार आहे. यापूर्वी कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ५९ सामन्यात ३५ विजय, १४ पराभव व १० अनिर्णित अशी कामगिरी केली आहे. जर कोहली हा सामना जिंकला तर विंडीजचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ३६ विजयांची नोंद असलेल्या सर क्लाईव्ह लॉईड यांच्या कामगिरीशी कोहली बरोबरी करू शकतो.
                         याच बरोबर कोहलीने या सामन्यात १७ धावा बनविल्या तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणजे कसोटी, वनडे व टि २० मध्ये बारा हजार धावा करणारा तो जगातील तिसरा कर्णधार बनेल. कोहलीच्या पूर्वी हा कारनामा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग १५४४० धावा, व दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅहम स्मिथ १४८७८ धावा या दोघांच्याच नावावर आहे.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close