पाणी प्रश्नावर रत्नाकर मखरेंच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
इंदापूर प्रतिनिधी: (दि. ५ मार्च.२१) माझं उपोषण सत्तेच्या विरोधात नसून खडकवासला पाटबंधारे विभागाच्या मुजोर अधिकाऱ्यां विरोधात आहे.असे भिमाई पाणी वापर सहकारी संस्था मर्या. गलांडवाडी नं.२ चे चेअरमन आणि इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी स्पष्ट केले आहे.
मखरे म्हणाले की, खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चोपडे आणि कार्यकारी अभियंता पाटील हे नियमबाह्य पद्धतीने पाण्याची विक्री करतात. उन्हाळ्याच्या नियंत्रणाच्या काळात लाखो रुपये कमावतात असा गंभीर आरोप मखरे यांनी केला आहे. या संदर्भात शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदनाच्या प्रती सबंधितांना स्पीड पोस्ट द्वारे यापूर्वीच पाठविलेल्या आहे. पाटबंधारे खात्याचा पाणीवाटपाचा नियम टेल टू हेड असा असताना ते हेड टू टेल असे पाणी वाटप करतात व पुन्हा टेल टू हेड पाणी वाटप करतात.
मखरे म्हणाले की,माझी भिमाई पाणी वापर सहकारी संस्था असून ती गलांडवाडी नं.२ च्या हद्दीत येत असून माझ्या सोसायटीच्या हद्दीतील शेतकऱ्यांना गेल्या १५ दिवसांपूर्वी पाणी मिळाले असते तर गहू, हरभरा, ज्वारी, मका इत्यादी पिकांना जीवदान मिळाले असते. पाणी वेळेवर न मिळाल्याने माझ्या सोसायटीच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांची उभी पिके पाण्यावाचून करपून गेली व शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे आर्थिक नुकसान चोपडे व पाटील या अधिकाऱ्यांमुळे झाले आहे असे स्पष्ट मत मखरे यांनी व्यक्त केले. त्यामुळे या मुजोर आणि निर्डावलेल्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी आणि शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान चोपडे व पाटील यांच्याकडून सरकारने वसूल करून शेतकऱ्यांकडे सुपूर्द करावे अशी मागणी यावेळी मखरे यांनी लाक्षणिक उपोषण सुरू असताना केली आहे. दि.५/३ /२१ रोजी खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापन उपविभाग इंदापूर यांच्या कार्यालयासमोर सकाळी १० :३० वा. एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले होते. यावेळी गलांडवाडी २ च्या हद्दीतील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण स्थळी भेट देऊन मखरे यांना पाठिंबा दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली.

