shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सचिन तेंडुलकरच्या शंभराव्या शतकाची कहाणी..!!



                    भारतात क्रिकेटला धर्म तर क्रिकेटपटूंना देवता म्हणून गणले जाते. अशाच सचिन तेंडुलकर नामक क्रिकेटपटूने आपल्या २५ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भल्या मोठ्या प्रवासात शंभर शतकांचा महापराक्रम केला. असा चमत्कार करणारा सचिन जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील आजवरचा एकमेव खेळाडू असल्याने त्याला देवाचा दर्जा देण्यात काहीएक गैर नाही.
                    सन १९८९ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा करणाऱ्या सचिनने सन १९९० मध्ये कसोटीतील पहिलं शतक इंग्लंडविरूध्द इंग्लंडमध्ये ठोकलं. त्यानंतर या पठ्ठ्याने मागे वळून बघितलेच नाही.  आज बरोबर नऊ वर्षापूर्वी १६ मार्च २०१२ रोजी आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशविरूध्द ढाक्याच्या शेर ए बांगला स्टेडीयमवर आपलं शंभरावं आंतरराष्ट्रीय शतक झळकवून एक ऐतिहासीक कारनामा घडविला.
                   १६ नोव्हेंबर १९८९ ते १६ मार्च २०१२ या २३ वर्षांच्या प्रदिर्घ कालखंडात अनेक स्थित्यंतरे घडली. सचिननेही अनेक संकटांचा सामना केला. जगभरातल्या अनेक मैदानावर एकाचढ एक भेदक गोलंदाजांचा सामना करत सचिनने हा अशक्यप्राय मैलाचा दगड गाठला. 
                    शंभरावं शतक ठोकण्यासाठी सचिनला ९९ वं शतक ठोकल्यानंतर तब्बल ३६९ दिवस म्हणजे १ वर्ष व ४ दिवसांची प्रतिक्षा करावी लागली. सचिनने त्याच्या कारकिर्दीत जे शंभर शतके ठोकली त्यापैकी दोन शतकांदरम्यान लागलेला हा सर्वात मोठा कालावधी होता. त्यापूर्वी एकदा सलग ३१५ दिवस त्याच्या बॅटमधून एकही शतक निघाले नव्हते.
                    मार्च महिन्यात क्रिकेटच्या इतिहासात अनेक आश्चर्यजनक घडल्या त्यापैकी सचिनचे शंभरावे शतक ही ठळक घटना होय. कसोटीत ५१ व एकदिवसीय सामन्यात ४९ शतके असे एकूण १०० शतके ठोकणाऱ्या जगातील एकमेव खेळाडू असलेला सचिन भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळविणारा एकमेव क्रिकेटपटू होय. बांगलादेश विरूध्द ११४ धावांची खेळी करत शंभरावं शतक ठोकणाऱ्या सचिनला ३६९ दिवसात सहा वेळा शतकाच्या जवळ जाऊनही माघारी फिरावे लागले होते. त्यामुळे सचिनच्या त्या शंभराव्या शतकाला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त होते. चला तर सचिनच्या त्या हुकलेल्या सहा शतकांविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया.
                     ९९ शतकं झाल्यानंतर सन २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत मोहाली येथे उपांत्य सामन्यात पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीने सईद अजमलच्या गोलंदाजीवर ८५ धावांवर झेेल घेऊन सचिनबरोबरच तमाम क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता.
                     त्यानंतर इंग्लंड दौऱ्यात ओव्हलच्या चौथ्या कसोटीत ९० धावांवर असताना टिम ब्रेसननच्या गोलंदाजीवर पायचित झाला होता. वेस्ट इंडिज विरूध्द दिल्लीत ७६ व मुंबईला ९४ धावांवर सचिन बाद झाला होता.
                     भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सचिन शंभरावं शतक ठोकेल म्हणून त्याच्या सन्मानार्थ ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने एक खास करंडक बनविला होता.  सचिन जेथे खेळायला जात असे तेथे तो करंडक नेला जायचा. परंतु सचिन मेलबोर्नला ७३ व सिडनीला ८० धावांवर बाद झाला. त्यामुळे तो करंडक तसाच पडून राहीला.
                       सचिनने शंभराव्या शतकापूर्वी बांगलादेशला जाण्यापूर्वी स्वतःची केशरचना बदलली होती. ती बाब खास शतकासाठी केल्याची काही जण चर्चा करत होते.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close