इंग्लंडविरूध्दचा चौथा टि २० सामना या मालिकेतील भारताच्या अस्तित्वाचा मुद्दा बनला होता. या मालिकेतील पहिल्या व तिसऱ्या सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला होता. तर काही अंशी भारतीय संघातील बेदिलीही उघड झाली होती.
त्या पार्श्वभूमिवर चौथा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने मागील तीन १, ०, ०, अशी कामगिरी करणाऱ्या के एल राहुलला पुन्हा संधी दिली. तर इशान किशन जखमी असल्याने दुसऱ्या सामन्यात निव्वळ क्षेत्ररक्षक म्हणून संघात घेतलेल्या सुर्यकुमार यादवला संधी दिली. कोहलीचा लाडका युजवेंद्र चहल मागील बऱ्याच सामन्यातील अपयशामुळे आपले संघातील स्थान गमावून बसला. त्याच्या जागी आलेल्या राहुल चहारने नमिळालेल्या संधीचे सोने केले.
उपकर्णरrधार रोहीत शर्मा धडाकेबाज सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला तर केएल राहुल शुन्यातून मोकळा झाला खरा पण अपयशाने या डावातही त्याचा पिच्छा सोडला नाही. शिवाय कर्णधार कोहलीही अपयशी ठरला. मात्र पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजी न मिळालेल्या सुर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सामना केलेल्या पहिल्याच चेंडूवर आर्चरचा चेंडू मैदानाबाहेर भिरकावून आपल्यावर आजपर्यंत झालेल्या अन्यायाला बॅटने वाट मोकळी करून देत ३० चेंडूत ५७ धावांची घणाघाती खेळी केली. परंतु नियतीच्या रूपात असलेल्या तिसऱ्या पंचाने त्याचा घात केल्याने त्याचे मोठी खेळी करण्याचे स्वप्न भंगवले.
या सामन्यात रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर यांनी चौकारांनी पहिल्यायाच चेंडूवर खाते खोलले तर रोहीत व सुर्यकुमारने षटकार ठोकून धावांचा श्रीगणेशा केला. रिषभ पंत, श्रेयस अय्यर यांनी शानदार फलंदाजी केली. भारताने या मालिकेत नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना प्रथमच १८० च्यावर धावा केल्याने भारतीय डावाला आकार मिळाला व गोलंदाजांना बळ मिळाले.
या सामन्यात पंचांची कामगिरी थट्टेचा विषय बनली होती. शानदार खेळ करणारा सुर्यकुमार यादव इंग्लिश क्षेत्ररक्षक डेव्हीड मलानने घेतलेल्या झेलामुळे नव्हे तर टिव्ही अंपायर विरेंदर शर्माच्या मुर्खपणाने दिलेल्या निर्णयाचा बळी ठरला. याच विरेंदर शर्माचा बिनडोकपणा येथेच थांबला नाही तर सिमारेषेला धक्का देत आदिल राशिदने वॉशिंग्टन सुंदरचा झेल टिपला तरी या शर्मा महाशयांनी षटकार द्यायचा सोडून सुंदरला बाद ठरवत आपल्याच लायकीचे धिंडवडे स्वतःच काढले.
गोलंदाजीत शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, राहुल चहार व हार्दिक पांड्याने सुंदर गोलंदाजी केल्याने निसटू पाहणारा सामना भारताच्या पारडयात विजय देऊन गेला. इंग्लिश संघानेही तिव्र प्रतिकार केल्याने सामना शेवटपर्यंत रंगतदार झाला.कर्णधार कोहली मुंबईकर खेळाडूंना नेहमी सापत्न वागणूक देत असतो. परंतु आजच्या विजयात मुंबईच्या श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, सुर्यकुमार यादव व मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पांडया व राहुल चहारने या विजयात मोठा वाटा उचलला तर शेवटच्या टप्प्यात काही कारणास्तव मैदानाबाहेर गेलेल्या कर्णधार कोहली ऐवजी नेतृत्व करणाऱ्या रोहीत शर्माने हाताबाहेर जाणारा विजय आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर हिरावून आणला.
आता पाचवा व शेवटचा सामना अंतिम सामन्याचं रूप धारण करणार असून या सामन्यातील विजेता या मालिकेचा विजेता ठरणार आहे. त्यामुळे करो मरोची स्थिती दोन्ही संघासाठी असली तरी भारताला मायदेशात खेळण्याचा फायदा उठविण्यासाठी संघाची योग्य निवड व मतभेद टाळणे अगत्याचे ठरणार आहे. या दोन बाबी जर कोहलीने व्यवस्थित पार पाडल्या तर विजेतेपदाचा करंडक भारताबाहेर जाऊच शकणार नाही.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

