औरंगाबाद: औरंगाबादमधील येथील चिकलठाणा परिसरातील जिल्हा रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुलाबराव ढवळे असे रुग्णाचे नाव असून हा रुग्ण तब्बल साडेचार तास ऑक्सिजनविना शौचालयांमध्ये पडून होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
रात्रीच्या सुमारास शौचालयात गेलेला हा रुग्ण चक्कर येऊन शौचालयात पडला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांच्याकडे कुठलेही लक्ष दिले नाही. तब्बल साडेचार तास रुग्ण परत न आल्यामुळे इतर रुग्णांनी तक्रार केल्यानंतर शौचालयात जाऊन तपासले असता शौचालयाचे दार बंद होते.
त्यानंतर दरवाजा तोडून पाहिले असता रुग्ण हा बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यानंतर रुग्णाला तपासले असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

